नरभक्षक वाघ बनबेहरा जंगलात; दहशत कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2018 06:36 PM2018-11-04T18:36:32+5:302018-11-04T18:38:18+5:30
पाच दिवसांपासून नरभक्षक वाघ मध्यप्रदेशच्या आठनेर वनपरिक्षेत्राच्या जंगलात ठिय्या मांडून आहे. शनिवारी रात्री चार दिवसांच्या पलासपानी जंगलातून रविवारी बनबेहरा जंगलात त्याचे पगमार्क आढळले.
- नरेंद्र जावरे
परतवाडा (अमरावती) : पाच दिवसांपासून नरभक्षक वाघ मध्यप्रदेशच्या आठनेर वनपरिक्षेत्राच्या जंगलात ठिय्या मांडून आहे. शनिवारी रात्री चार दिवसांच्या पलासपानी जंगलातून रविवारी बनबेहरा जंगलात त्याचे पगमार्क आढळले. पुढची दिशा उत्तर की पश्चिम, यावरच आता सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. वाघाची दहशत अद्यापही कायम आहे.
बारा दिवस अमरावती जिल्हा दहशतीखाली ठेवणारा नरभक्षक वाघ पाच दिवसांपासून मध्यप्रदेशच्या बैतूल जिल्ह्यातील आठनेर वनपरिक्षेत्रातील जंगलात आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील वनाधिकारी त्याचे दररोजचे लोकेशन घेत आहेत. रविवारी सायंकाळपर्यंत परतवाडा, मोर्शी आणि वरूड परिक्षेत्रातील वन कर्मचारी सीमाभागावर लक्ष ठेवून होते. या चार दिवसांत त्याने कुठलीच शिकार केली नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे वाघोबाची पुढची शिकार काय, यावरच गस्तीवरील कर्मचाºयांमध्ये खल सुरू होता. त्याची पुढील वाटचाल उत्तर दिशेकडे राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बहिरम की सातपुडा व्याघ्र प्रकल्प?
चंद्रपूरपासून उत्तर दिशेचा प्रवास मध्य प्रदेशातही युवा नरभक्षी वाघाने कायम ठेवला आहे. पलासपानीतून पुढे बनबेहरा जंगलात जाताना त्याने उत्तर दिशेनेच पुढची वाटचाल केली. ही वाटचाल सुरूच राहिल्यास बैतूलच्या सातपुडा टायगर रिझर्वमध्ये तो स्थिरावू शकतो. बहिरम वाघाच्या सध्याच्या ठिकाणापासून २५ किमी अंतरावर पश्चिमेकडे आहे. तेव्हा नरभक्षी बहिरमच्या जंगलात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुढील आठवडाभर त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जाणार आहे. वाघ ज्या दिशेने आला त्याच दिशेने परत जाण्याची येत नसल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे.
अवनीप्रमाणे त्यालाही शूट करा
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा परिसरात प्रचंड दहशत पसरून अनेकांचा जीव घेणाºया अवनी वाघिणीला शनिवारी गोळ्या घालून ठार करण्यात आले, तर बारा दिवस जिल्ह्यात धुमाकूळ घालून दोन जणांचा जीव आणि पाळीव प्राण्यांची शिकार करणाºया युवा वाघाला केवळ बंदुकीतून बेशुद्धीचे इंजेक्शन देण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून देण्यात आल्या. वनविभागाच्यावतीने ठिकठिकाणी त्याला अडकविण्यासाठी पिंजरा लावला. चतुर वाघाने मार्ग बदलू पुढचा पल्ला गाठला. वाघ पुन्हा परतल्यास त्याला हमला करण्यापूर्वी तत्काळ जेरबंद किंवा गोळ्या घालून ठार करण्याची ही मागणी आता अवनीला ठार केल्यानंतर होऊ लागली आहे.