पश्चिम विदर्भात वाघांचे छुपे कॉरिडोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 05:44 PM2018-10-28T17:44:12+5:302018-10-28T17:45:58+5:30

विदर्भाच्या पाच व्याघ्र प्रकल्पांतील वाघांनी आपल्या सीमा विस्तारल्या आहेत. हल्ली सात जिल्ह्यांमध्ये वाघांची ये-जा करण्याचा सिलसिला सुरू आहे.

Tiger corridor in vidarbha | पश्चिम विदर्भात वाघांचे छुपे कॉरिडोर

पश्चिम विदर्भात वाघांचे छुपे कॉरिडोर

googlenewsNext

गणेश वासनिक 

अमरावती - विदर्भाच्या पाच व्याघ्र प्रकल्पांतील वाघांनी आपल्या सीमा विस्तारल्या आहेत. हल्ली सात जिल्ह्यांमध्ये वाघांची ये-जा करण्याचा सिलसिला सुरू आहे. यासाठी वाघांनी नव्याने आश्रयस्थानासाठी छुपे ‘कॉरिडॉर’ निर्माण केल्यामुळे व्याघ्र संरक्षणाचा नवा पेच वनविभागापुढे उभा ठाकलेला आहे.

ताडोबा, अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ पूर्वी अमरावती जिल्ह्यात येत नव्हते. मात्र, गेल्या २ वर्षांपासून या व्याघ्र प्रकल्पातील वाघ हे सहजरीत्या नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात दिसू लागले आहेत. पेंच येथून राष्ट्रीय महामार्ग ओलांडून वर्धा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात ये-जा करीत आहेत. व्याघ्र प्रकल्पातील विस्तीर्ण क्षेत्र आता वाघांना अपुरे पडत आहे. त्यामुळे वाघाने आता सावज नव्हे तर नवीन आश्रयस्थान (जंगल) शोधण्यास सुरुवात केली आहे. सध्या अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात धुमाकूळ घालणारे दोन्ही वाघ हे २५० कि.मी. अंतर लिलया पार करून जिल्ह्यात शिरले आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघाने काटोल, कळमेश्र्वर, कोंढाळीमार्गे बोर अभयारण्यातून अमरावती जिल्ह्यात प्रवेश करून नवीन रस्ता तयार करीत आहे. विशेषत: वर्धा नदी ओलांडून हे दोन्ही वाघ अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात येताना दृष्टीस पडले आहे. व्याघ्र प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या वाघावर लक्ष नसल्याने नवीन आश्रयासाठी शेतात त्यांचा संचार सुरू आहे. ताडोब्यातून वाघ वरोरा तर गिरड, समुद्रपूर, उमरेड, कऱ्हाडला किंवा गोंदिया, भंडारात प्रवेश करून पळतात. पेंचमधून निघणारे वाघ हे वर्धा जिल्ह्यातील कोंढाळी, भारपीट, वाढोणा या कॉरिडॉरने अमरावती जिल्ह्यात पोहचत आहेत. तसेच यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव, पांढरकवडा या नवीन ‘कॉरिडॉर’ने येत असल्याचे वास्तव आहे.

व्याघ्र प्रकल्पांची ‘कनेक्टिव्हिटी’ आवश्यक

विदर्भातील पाचही व्याघ्र प्रकल्प एकमेकांशी जोडणे आवश्यक झाले आहे. वाघांची वाढती संख्या आणि व्याघ्र प्रकल्पांचे अपुरे क्षेत्र ही देखील नवीन समस्या निर्माण झाली आहे. मेळघाट, ताडोबा, बोर, नवेगाव बांध, नागझिरा, पेंच या व्याघ्र प्रकल्पांची ‘कनेक्टिव्हिटी’ अनिवार्य झाली आहे. हे पाचही व्याघ्र प्रकल्प एकमेकांशी जोडल्यास वाघ संरक्षित क्षेत्राबाहेर पडणार नाही. मेळघाटातील वाघ अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये जाण्याची शक्यता आहे. पेंच, ताडोबा, बोर, नवेगाब -नागझिरा या व्याघ्र प्रकल्पांतील वाघ बाहेर पडताहेत. अपुऱ्या क्षेत्रामुळे ही वस्तुस्थिती निर्माण झाली आहे. साधारत: दरदिवशी २० कि.मी. चालणारा वाघ हल्ली ४० ते ५० कि.मी. चालत आहे. गत काही दिवसांपासून धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर, अंजनसिंगी या भागात मुक्त संचार करणारा वाघ दरदिवसाला ५० कि.मी. अंतर पार करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विदर्भातील पाचही व्याघ्र प्रकल्पांना एकमेकांशी जोडण्याबातचा प्रस्ताव राज्य शासनामार्फत केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, त्याकरिता मोठा निधी लागणार आहे. व्याघ्र प्रकल्पांची ‘कनेक्टिव्हिटी’ झाल्यास वाघांसह अन्य वन्यप्राण्यांचेदेखील संरक्षण करणे सोयीचे होईल व निसर्गाचे जतन करता येईल.
- सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र
 

Web Title: Tiger corridor in vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.