मेळघाटात २० जानेवारीपासून व्याघ्र गणना; प्रथमच जीपीएस एम-ट्रॅकचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 11:29 AM2017-12-22T11:29:35+5:302017-12-22T11:30:20+5:30
वाघांचे अधिवास, संवर्धन, विकासासाठी उपाययोजना आणि नेमकी त्यांची आकडेवारी किती, या पडताळणीसाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात २० ते २९ जानेवारी दरम्यान व्याघ्र गणना होणार आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : वाघांचे अधिवास, संवर्धन, विकासासाठी उपाययोजना आणि नेमकी त्यांची आकडेवारी किती, या पडताळणीसाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात २० ते २९ जानेवारी दरम्यान व्याघ्र गणना होणार आहे. पहिल्यांदाच ‘जीपीएस एम-टॅक’ हे अॅप्लिकेशन वापरले जाणार आहे. पायांचे ठसे, ट्रॅपिंग कॅमेरे, पारंपरिक पद्धतीदेखील व्याघ्र गणनेची वैशिष्ट्ये राहणार आहेत.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने २० जानेवारीपासून व्याघ्र गणनेचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. ‘जीपीएस एक-ट्रॅक’ ही प्रणाली पहिल्यांदाच वापरली जात असल्याने व्याघ्र प्रकल्पात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ३१ डिसेंबरपर्यंत प्रशिक्षण दिले जाणार आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाकडून दर चार वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते. यापूर्वी २०१४ मध्ये व्याघ्र गणना झाली. त्यानंतर आता जानेवारी २०१८ मध्ये होत आहे. मेळघाटात दोन टप्प्यात गणना होणार असून, पहिल्या टप्प्यात ७ जानेवारी २०१८ पर्यंत ट्रॅपिंग कॅमेरे, तर दुसऱ्या टप्प्यांत १५ जानेवारीपासून पाच दिवस ‘जीपीएस एम-ट्रॅक’द्वारा गणना केली जाईल. त्रृट्यांबाबतचे प्रशिक्षण १८ जानेवारी रोजी देण्यात येईल. त्यानंतर व्याघ्र गणनेत २० ते २९ जानेवारीदरम्यान वाघांच्या पायाचे ठसे, विष्ठा, शिकारीचे प्रकार आदींचा अभ्यास करून माहिती संकलित केली जाईल. २६ ते ३१ जानेवारी दरम्यान प्रपत्र तपासले जातील. त्यानंतर व्याघ्र गणनेचा १ ते २० फेब्रुवारीदरम्यान डेटा अपलोड केला जाईल. गणनेची अंतिम माहिती डेहरादून येथे २८ फेब्रवारी ते १५ मार्च २०१८ दरम्यान पाठविली जाईल, असा अधिकृत कार्यक्रम व्याघ्र गणनेचा मेळघाटने तयार केला आहे.
पायी गस्त
जंगल व वन्यजिवांच्या संरक्षणासाठी वनकर्मचाऱ्यांना जंगलात पायी गस्त घालण्याची सक्ती आहे. जीपीएस एम- ट्रॅक अॅप्लिकेशनमुळे कोणी, किती अंतर गाठले, हे क्षणात कळते. हीच प्रणाली व्याघ्र गणनेसाठी वापरली जाईल, असे डीएफओ माळी यांनी सांगितले.
व्याघ्र गणनेसाठी पहिल्यांदाच जीपीएस एम-ट्रॅक अॅप्लिेकशन वापरले जात आहे. २० ते २९ जानेवारीदरम्यान व्याघ्र गणना होईल. गणनेसाठी पारंपरिक व अत्याधुनिकतेची जोड आहे.
- एम.एस. रेड्डी,
संचालक, व्याघ्र प्रकल्प मेळघाट