पोलिसांच्या हातावर तुरी देऊन विजय कुबडे पसार
By admin | Published: January 17, 2017 12:04 AM2017-01-17T00:04:29+5:302017-01-17T00:04:29+5:30
संशयास्पद व्यवहाराद्वारे शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवणाऱ्या कुबडे ज्वेलर्सचे संचालक विजय कुबडेने सोमवारी पोलिसांच्या हातावर तुरी दिली.
न्यायालयात सापळा : प्रतिष्ठानावर धाड, कर्मचाऱ्यांचे बयाण
अमरावती : संशयास्पद व्यवहाराद्वारे शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवणाऱ्या कुबडे ज्वेलर्सचे संचालक विजय कुबडेने सोमवारी पोलिसांच्या हातावर तुरी दिली. शहर कोतवाली पोलिसांनी विजय कुबडे याला अटक करण्यासाठी न्यायालय परिसरात सापळा रचला होता. मात्र, याचा सुगावा लागल्याने विजय कुबडे न्यायालयात पोहोचलाच नाही.
जिल्हा उपनिबंधक राजेंद्र पालेकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी परवानाधारक सावकार महादेव कुबडेविरूद्ध गुन्हे नोंदविले. तूर्तास कुबडे ज्वेलर्सचे संचालक म्हणून आता त्यांचा मुलगा विजय कुबडे जबाबदारी सांभाळत आहे. विजय कुबडे व त्यांचा मुलगा समीर हे दोघेही सावकारीचे कामकाज पाहतात. कोतवाली पोलिसांनी सोमवारी या प्रतिष्ठानात धाड घालून तेथील महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात घेतले.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
अमरावती : कुबडे ज्वेलर्सकडे असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. समीर कुबडेसह तेथील काही कर्मचाऱ्यांचे बयाण पोलिसांनी नोंदविले. तेथील सीसीटीव्ही फुटेजची पाहणीसुद्धा केली. त्यानंतर विजय कुबडे हे अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात येत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. पोलिसांनी न्यायालयात सापळा रचला. मात्र, याची पूर्वसूचना विजय कुबडेला मिळाल्याने न्यायालय परिसरात पोहोचण्याची त्याची हिंमत झाली नाही. पोलिसांना रिक्त हस्ते परतावे लागले. याप्रकरणी ठाणेदार विजय पाटकर यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गोकूळ ठाकूर करीत आहे.
१० किलो सोने गहाण
शहर कोतवाली पोलिसांनी सोमवारी ‘कुबडे ज्वेलर्स’ची झडती घेऊन महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केले. शेतकऱ्यांनी अंदाजे १० किलो सोने गहाण ठेवल्याचे उपलब्ध दस्ताऐवजांच्या आधारे निदर्शनास आले. या सोन्याची किंमत १ कोटी ७१ लाख रुपये असल्याचा अंदाज आहे. या शेतकऱ्यांवर कुबडे ज्वेलर्समुळेच कर्जमाफीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ‘आॅफ दी रेकॉर्ड’ व्यवहार किती पसरलेला आहे, हेदेखील तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काँग्रेसनगरातील घरावर 'वॉच'
शहर कोतवाली पोलिसांनी कुबडे ज्वेलर्समध्ये जाऊन महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केले. त्यानंतर विजय कुबडेला अटक करण्यासाठी पोलीस त्यांच्या काँग्रेसनगरातील घरी गेले होते. तेथेही ते आढळून आले नाहीत. पोलिसांनी त्यांच्या आप्तांची चौकशी केली. घरावर 'वॉच' ठेवला आहे.