बेकरी उत्पादनाची गुणवत्ता काय ?
By admin | Published: October 3, 2016 12:07 AM2016-10-03T00:07:52+5:302016-10-03T00:07:52+5:30
मनभरी उत्पादनाच्या चिवड्याच्या पाकिटात अख्खी पाल आढल्यामुळे मनभरीचा कारभार चव्हाट्यावर आला.
पालकमंत्री गप्प का ? : एफडीए केव्हा घेणार नमुने ?
अमरावती : मनभरी उत्पादनाच्या चिवड्याच्या पाकिटात अख्खी पाल आढल्यामुळे मनभरीचा कारभार चव्हाट्यावर आला. चिवड्यात विषारी प्राणी आढळणाऱ्या मनभरीच्या बेकरी उत्पादनाची गुणवत्ता किती, असा प्रश्न आता ग्राहकांना पडला आहे.
मनभरीची नाना बेकरी उत्पादने बाजारात आहेत. या उत्पादनादरम्यान अन्न व औषधी प्रशासनाच्या नियमांनुसार पाळाव्या लागणाऱ्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाते की नाही, हा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे.
मनभरी चिवड्याच्या पाकिटात अख्खी पाल आढळून आल्यानंतर मनभरीला अन्न व औषधी प्रशासनाने आजपर्यंतही अधिकृतरीत्या नोटीस बजावलेली नाही. एफडीएने मनभरीच्या उत्पादन केंद्रात भेट दिली. तपासणी केली. त्यादरम्यान रजिस्टरमध्ये त्यांनी नोंद केली. त्यात सर्व माल परत बोलवावा, असा शेरा लिहिला. त्यानंतर एफडीएने कारवाईचा शिकंजा हवा तसा आवळलेला नाही. बेकरीची मोठ्या प्रमाणात उत्पादने असताना आणि ती व्यापकरीत्या विकली जात असताना, एकाच ब्रँडच्या या अन्नप्रकाराचे नमुनेही एफडीएने घ्यायला हवे होते. सामान्य ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब उपयोगी ठरली असती. चिवड्याचे उत्पादन जी मंडळी करतात, तीच मंडळी बेकरी प्रोडक्टचेही निर्माते असल्यामुळे सदोषतेच्या शक्यतेची सुई ब्रेड, टोस्ट आदी अन्नप्रकारांकडेही वळतेच. आपण काय खातो, याबाबत सामान्यजन आता कमालीचे सतर्क झाले आहेत. मनभरीच्या सर्वच अन्नपदार्थांचे नमुने एफडीएने घ्यावे. रन्डमली ते घेत रहावे, अशी मागणी नागरिकांनी 'लोकमत'ला पाठविलेल्या पत्रांतून केली आहे.
अमरावती जिल्ह्यात एफडीएचे अस्तित्त्व आहे की नाही, स्थिती इतकी खालावलेली आहे. आंब्यांमध्ये कार्बाईड, केळीत इथेनॉल, सफरचंदांना मेण, रघुवीरच्या कचोरीत अळी, शांती रिफ्रेशमेंटच्या कचोरीत गुटख्याचे पाऊच आणि हे सारे कमी झाले म्हणून की काय मनभरीच्या चिवड्यात चक्क पाल, असे चित्र शहरातील अन्नविषयक उत्पादनांच्या विक्रीचे आहे. सामान्यंच्या खाण्यात जहर कालवले जात असतानाही शासन शांत आहे. मनभरी, रघुवीरसारख्या ब्रँडवर जिल्ह्याचे पालकमंत्री कठोर कारवाई करतील काय, असा प्रश्न अमरावतीकरांचा आहे. (प्रतिनिधी)