मृतदेहांची विटंबना रोखणार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 10:55 PM2017-10-15T22:55:52+5:302017-10-15T22:56:30+5:30
हिंदू संस्कृतीत मृत्यूपश्चात केले जाणारे विधिवत संस्कार आत्म्याच्या शांतीसाठी विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : हिंदू संस्कृतीत मृत्यूपश्चात केले जाणारे विधिवत संस्कार आत्म्याच्या शांतीसाठी विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. परंतु हिंदू स्मशानभूमित मृतदेहांची विटंबना होत असल्यामुळे मरणानंतरही विधी संस्कार अपूर्ण राहतात. त्यामुळे मृतदेहांची वारंवार होणारी विटंबना रोखणार कोण, असा प्रश्न जनसामान्यांमध्ये उपस्थित होत आहे.
महिनाभरात दोन बाळांचे पुरलेले मृतदेह उकरून काढण्यात आले आणि त्याचे नामोनिशाण अदृष्य झाल्यासारख्याच धक्कादायक प्रकार समोर आला. मानवी मृतदेह गायब होण्याचा हा सिलसिला अनेक दिवसांपासून सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे हिंदू स्मशानभूमितील एकाच परिसरात मृत जनावरे व माणसांना पुरले जातात. अनेकदा ज्या ठिकाणी जनावरे पुरले गेलेत, तीच जागा खोदून त्यात मानवी मृतदेहसुध्दा पुरल्याचे स्पष्ट झाले आहे. हिंदू स्मशानभूमितील हा प्रकार मानवाधिकार हनन करणारा आहे. राजापेठ पोलिसांनी हिंदू स्मशानभूमित होणारा विटंबनेचा प्रकार वरिष्ठ स्तरावर कळविला आहे. तेथे रोज दोन बाळांचे दफनविधी होत असल्याची माहिती संस्थेतील कर्मचाºयांनी दिली. त्यानुसार महिन्याकाठी ६० बाळांचे मृतदेह जमिनीत पुरले जात असावेत. या बाळांच्या मृतदेहापैकी किती मृतदेह उकरून काढले याचा हिशेबच कुणी ठेवणार नाही. दोन बाळांच्या नातेवाईकांनी त्यांच्या आप्तेष्टांचा मृतदेह गायब झाल्याची दखल घेऊन पोलीस तक्रार केली. मात्र, ज्यांनी मृतदेह पुरल्यानंतर पुन्हा त्या जागेवर जाऊनच पाहिले नाही त्यांच्या पुरलेल्या मृतदेहांचे काय झाले, हे जाणून घेण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही.
पहिल्या घटनेवेळी पोलिसांनी हिंदू स्मशानभूमितील व्यवस्था सुधारण्यासाठी सक्त नोटीस बजावली होती. मात्र, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आणखी एका बाळाचा मृतदेह काढून नेल्याचा प्रकार घडला. आणखी किती दिवस मानवी मृतदेहांची अशी विटंबना चालणार आहे, ती रोखणार कोण, असा प्रश्न अमरावतीकरांनी उपस्थित केला आहे.
नोटीसला केराची टोपली
हिंदू स्मशानभूमितील व्यवस्था सुधारण्यासंबंधी राजापेठ पोलिसांनी हिंदू स्मशान भूमीच्या विश्वस्थांना नोटीस बजावली. मानवी मृतदेहांची विटंबना होत असल्याचे पत्र राजापेठ पोलिसांनी पोलीस आयुक्त, जिल्हाधिकाºयांना पाठविले होते. मात्र, पोलिसांंच्या नोटीसची गंभीर दखल न घेता नोटीसला केराची टोपली दाखविले आहे.
मग पैसे घेता कशासाठी ?
हिंदू स्मशानभूमित मृतदेह पुरण्यासाठी २०० रुपये घेतले जातात. मात्र, त्यानंतरही मृतदेह पुरण्याचा खड्डा करण्यासाठी कर्मचाºयांना आगाऊ पैसे द्यावेच लागते. तीन ते पाच फुटापर्यंत खड्डा खोदून मृतदेह पुरणे आवश्यक असते. मात्र, खड्डे खोदणारे केवळ दीड फुटांचाच खड्डा खोदतात. त्यामुळे मृतदेह उकरण्याचा प्रकार घडत आहे. मग हिंदू स्मशानभूमी पैसे घेते तरी कशाला, असा सवाल आप्तजन विचारत आहेत. संस्थेने खड्डे खोदणाºयांची इत्यंभूत माहिती ठेवणे गरजेचे आहे. मात्र, तसे होत नसल्याचे आढळून आले आहे.