पत्नीचा गळा दाबून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 09:53 PM2018-02-05T21:53:31+5:302018-02-05T21:54:25+5:30
संशयी पतीने प्रथम पत्नीच्या शरीरावर चाकूचे वार केले. ती वेदनेने विव्हळत आहे, मेलेली नाही, हे समजताच गळा दाबून तिचा जीव घेतला.
आॅनलाईन लोकमत
अंजनगाव बारी/चांदूररेल्वे: संशयी पतीने प्रथम पत्नीच्या शरीरावर चाकूचे वार केले. ती वेदनेने विव्हळत आहे, मेलेली नाही, हे समजताच गळा दाबून तिचा जीव घेतला. यानंतर पतीने पलायन केले. समाजमन सुन्न करणारी ही घटना चांदूररेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एरंडगाव येथे घडली.
अर्चना राहुल वानखडे (२५) असे मृताचे व राहुल रामराव वानखडे (२७) असे खून करणाºया पतीचे नाव आहे. सोमवारी सकाळी अर्चना ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली व सोबच चाकू तिचे सासरे रामराव यांच्या निदर्शनास आल्यानंतर या खुनाला वाचा फुटली. यासंदर्भात पोलीस पाटील सतीश देशमुख यांनी चांदूररेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यातील तक्रारीनुसार, हे दाम्पत्य शेतमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होते. मोर्शी तालुक्यातील शिरखेड येथील मोहन गुलाबे यांची कन्या अर्चना हिचे ७ वर्षांपूर्वी राहुलशी लग्न झाले. लग्नानंतर काही वर्षांनी राहुल पत्नी अर्चना हिच्या चारित्र्यांवर संशय घेत होता. यातूनच त्यांचे वाद झडत असत.
रविवार, ४ फेब्रुवारीला निजानिज होण्यापूर्वीही त्यांच्यात भांडण झाले. त्याचा राग मनात धरून सोमवारी पहाटे ५ च्या सुमारास राहुलने झोपेत अर्चनाच्या शरीरावर आधी चाकूने वार केले. मात्र, ती मेलेली नाही, हे लक्षात येताच त्याने गळा दाबून तिचा खून केला. यानंतर राहुलने पलायन केले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार ब्रम्हा शेळके यांच्या नेतृत्वात चांदूररेल्वे पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
चांदूररेल्वे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांत भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीला बडनेरा-यवतमाळ मार्गावरून अटक केली. पोलिसांनी अवघ्या सहा तासांत शोधमोहीम राबवून आरोपी राहुल वानखडेला जेरबंद केले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
राहुलला दारूचे व्यसन
राहुल वानखडेला दारुचे व्यसन जडले असून तो आई-वडिलांना त्रास देत असे. त्याच्या त्रासापायी मांजरी वडील मांजरी म्हसला येथे राहण्यास गेले होते. दोन महिन्यापूर्वीच ते यरंडगावला आले आहेत. राहुल पत्नीसमवेत एरंडगाव येथे राहत होता.
मुले झाली पोरकी
राहुल आणि अर्चनाला दोन मुले. पहिला दोन वर्षांचा आणि दुसरा अवघ्या सहा महिन्यांचा. दारूड्या राहुलमुळे या मुलांचे संगोपन अर्चनाच मजुरीला जाऊन करीत होती. आता अर्चनाचा खून झाल्यामुळे आईविना दोन्ही मुले पोरकी झाली आहेत.