रॅगिंगप्रकरणी महिला संघटना गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 09:47 PM2017-09-07T21:47:30+5:302017-09-07T21:47:50+5:30
येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील वसतिगृहात अश्लील रॅगिंगप्रकरणी दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने राज्य महिला आयोगाच्या सदस्य नीता ठाकरे यांच्याकडे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील वसतिगृहात अश्लील रॅगिंगप्रकरणी दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने राज्य महिला आयोगाच्या सदस्य नीता ठाकरे यांच्याकडे केली.
महिला आयोगाच्या सदस्य नीता ठाकरे या गुरुवारी वसतिगृहात मुलींसोबत संवाद साधण्यासाठी आल्या असता विद्यापीठात अभाविप सदस्यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यामध्ये व्हीएमव्हीच्या वसतिगृहातील सिनिअर्स मुलींनी ज्युनिअर्स मुलींना अश्लील रॅगिंग करण्यास भाग पाडले. ही बाब खेदजनक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. रॅगिंगदरम्यान मुलींचे ऋतुस्त्राव तपासले गेले, हा प्रकार संतापजनक आहे. याप्रकरणी अन्यायग्रस्त मुलींनी संस्था संचालकांकडे तक्रार नोंदविली असतादेखील ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे मुलींनी न्यायासाठी मीडियाकडे धाव घेतली. अश्लील रॅगिंग प्रकरणाला खतपाणी घालण्यासाठी संस्थेच्या संचालकही दोषी असून याप्रकरणी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी अभाविपने केली आहे. मुलींच्या वसतिगृहात आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्याची जबाबदारी संस्थेची आहे. मात्र, मुलींच्या पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात आले असून याप्रकरणी चौकशी केल्यास बरेच तथ्य बाहेर येतील, असे अभाविपने म्हटले आहे. निवेदन सादर करताना विजया चिखलकर, शिवानी मोरे, अबोली पांचाळ, सृष्टी राजगिरे, पायल गेडाम, करूणा आडे, शुभांगी बोरकर यांचा समावेश आहे.
जिजाऊ ब्रिगेडने दिले संचालकांना निवेदन
शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेच्या वसतिगृहात झालेल्या दुष्प्रकाराबाबत जिजाऊ ब्रिगेडने गुरूवारी संस्थेच्या संचालिका अर्चना नेरकर यांना निवेदन सादर केले. व्हीएमव्ही हे विदर्भातील नावलौकिकप्राप्त संस्था असून मुलींच्या वसतिगृहात झालेला प्रकार नावलौकिकास गालबोट लावणारा आहे. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी हे महाविद्यालय शिक्षणाचे स्त्रोत असताना संस्थेच्या दुर्लक्षामुळे मुलींच्या वसतिगृहात हिडीस प्रकार घडला आहे. वसतिगृहात सॅनिटरी नॅपकीन इन्सिलेटर उपलब्ध नसल्याने विद्यार्थिनींची प्रचंड कुचंबना होते. त्यामुळे मुलींच्या वसतिगृहात आवश्यकतेनुसार उच्च दर्जाचे व संरक्षित सॅनिटरी नॅपकीन इन्सिलेटर त्वरीत लावण्यात यावे, अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने करण्यात आली. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या मयुरा देशमुख, कीर्तीमाला चौधरी, शीला पाटील, प्रतिभा रोडे, कल्पना वानखडे, मनाली तायडे, सुशीला धाबे, कांचन उल्हे, मैथिली पाटील उपस्थित होते.