झेडपीला मिळाला ‘माझी कन्या भाग्यश्री’चा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 10:33 PM2018-07-10T22:33:35+5:302018-07-10T22:33:59+5:30
महिला व बालविकास विभागाने सुरू केलेल्या माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत ५७२ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यासाठी राज्य शासनाकडून ८१ लाख २५ हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे आला आहे. या योजनत तालुक्यांतील लाभार्थ्यांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महिला व बालविकास विभागाने सुरू केलेल्या माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत ५७२ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यासाठी राज्य शासनाकडून ८१ लाख २५ हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे आला आहे. या योजनत तालुक्यांतील लाभार्थ्यांचा समावेश आहे.
मुलींच्या आरोग्य व शिक्षणात सुधारणा करणे, त्यांच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद यासह बालिका भ्रूणहत्या रोखण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
मुलांच्या तुलनेत मुलींचे जन्मदर कमी आहे. मुलींचा टक्का वाढावा यासाठी शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली आहे. योजनेअंतर्गत एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे ५० हजार रुपये फिक्स डिपॉझिट केले जाते. तर दोन मुलींवर कुटुंबनियोजन केल्यास दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी २५ हजार रुपये डिपॉझिट केले जाते. एका मुलीवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केलेल्या लाभार्थ्यांची संख्या केवळ ५ आहे. दोन मुलीनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेल्या लाभार्थ्यांची संख्या ५६७ आहे. त्यानुसार उपलब्ध निधीतून पहिल्या टप्प्यात ३२३ लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. यामुळे लाभार्थींची प्रतीक्षा आता संपणार आहे.
लाभार्थ्यांच्या नावे ही रक्कम फिक्स डिपॉझिट करण्यात येणार आहे. याबाबत बँकेकडून मिळालेले प्रमाणपत्र लाभार्थ्यांना दिले जाणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त पालकांनी लाभ घ्यावा.
- प्रशांत थोरात,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
महिला व बालकल्याण
मुलगी शिकली तर संपूर्ण घर शिकते. त्यामुळे तिला संधी द्या. योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेचा प्रयत्न असतो. माझी कन्या भाग्यश्री योजनामुळे गरीब कुटुंबांना फायदा होईल.
- वनिता पाल,
सभापती, महिला व बालकल्याण