५९८ फुकट्या प्रवाशांवर कारवाई
By Admin | Published: July 10, 2017 12:08 AM2017-07-10T00:08:55+5:302017-07-10T00:32:17+5:30
नांदेड : दक्षिण - मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून धावणाऱ्या गाड्यांमध्ये धाड टाकून ५९८ विनातिकीट प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : दक्षिण - मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून धावणाऱ्या गाड्यांमध्ये अचानक धाड टाकून तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली़ यामध्ये ५९८ विनातिकीट प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून १ लाख ८९ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला़ तसेच २० विनापरवाना रेल्वेत खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवरदेखील कारवाई करण्यात आली़
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी तसेच तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली जाते़ शनिवारी वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक श्रीमती नेहा रत्नाकर यांच्या पथकाने नांदेड विभागातून धावणाऱ्या अनेक गाड्यांमध्ये तिकीट तपासणी मोहीम राबविली़
मोहिमेत सहायक वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप कुमार, सहायक वाणिज्य व्यवस्थापक अंजी नायक यांचा समावेश होता़
सदर पथकाने पहाटे ४ वाजतापासून कारवाईस सुरूवात करून एका दिवसात एक लाख ८९ हजार रुपये दंड वसूल करून ५९८ प्रवाशांवर कारवाई केली़ यामध्ये नांदेड - आदिलाबाद, औरंगाबाद, परळी अशा विविध भागात धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये अचानक धाडी टाकण्यात आल्या. कारवाईसाठी बसेस, जीपचा वापर करण्यात आला.
धावणाऱ्या रेल्वेमध्ये सेक्शनमध्ये अचानक धाड पडल्याने विनातिकीट प्रवाशांचे धाबे दणाणले. यामध्ये ५९८ विनातिकीट प्रवासी सापडले. तसेच अनियमित प्रवास करणे आणि परवानगीशिवाय जास्त सामान घेवून जाण्यामुळे काही प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. यातही काही प्रवाशांनी दंड न भरल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली. या विनातिकीट प्रवाशांकडून १ लाख ८९ हजार रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला.
या कारवाईत रेल्वे सुरक्षा अधिकारी, ३३ तिकीट तपासणीस, ६ कार्यालयीन कर्मचारी, ५ वाणिज्य निरीक्षक, ३ ट्रॅफिक निरीक्षक, ८ रेल्वे पोलीस फोर्सचे जवान सहभागी होते़ या पथकाने नांदेड विभागातून धावणाऱ्या जवळपास सर्वच गाड्या तपासल्या़
यामध्ये बरेच प्रवासी सीझन तिकीट घेऊन आरक्षित डब्यात बसले होते तसेच दूधवाले जनरल तिकीट घेऊन प्रवास करत होते. त्यांना अशा प्रकारे प्रवास करता येणार नसल्याचे सांगण्यात आले़ तसेच त्यांनी एम.व्ही.एस.टी. तिकीट घेऊनच प्रवास करावा.