एक हजार पुरुषांमागे ९१३ महिला मतदार
By Admin | Published: September 13, 2014 10:54 PM2014-09-13T22:54:18+5:302014-09-13T23:05:02+5:30
परभणी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मतदारांची यादी जाहीर केली असून, या यादीत एक हजार पुरुषांच्या मागे ९१३ महिलांचे प्रमाण आहे.
परभणी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मतदारांची यादी जाहीर केली असून, या यादीत एक हजार पुरुषांच्या मागे ९१३ महिलांचे प्रमाण आहे. मध्यंतरी स्त्री-पुरुष गुणोत्तर बिघडल्याने राज्यात ही एक समस्या निर्माण झाली होती. जिल्हा प्रशासनाने महिला मतदारांची मोठ्या प्रमाणात नोंदणी केल्याने या गुणोत्तराचा चढता आलेख यादीत दिसत आहे.
मुलांच्या जन्मदराच्या तुलनेत मुलींचा जन्मदर घटल्याने ही एक सामाजिक समस्या निर्माण झाली होती. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासन पातळीवर मोठे प्रयत्न झाले. बेटी बचाव अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा परिणाम हळूहळू होत गेला. मागील लोकसभा निवडणूक काळात जिल्ह्यात मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला.
जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. त्यामुळे मतदार नोंदणीलादेखील चांगला प्रतिसाद मिळत गेला. मतदारांची संख्या वाढली. परंतु मतदार यादी प्रकाशित झाल्यानंतर दर हजारी पुरुषांमागे स्त्री मतदारांचे प्रमाण ८३० च्या आसपास राहिले. मतदार यादीतही स्त्री-पुरुष गुणोत्तर असमतोल असल्याचेच निदर्शनास आले. त्यामुळे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा महिला मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करण्यासाठी प्रशासकीय स्तरावरुन प्रयत्न झाले. अनेकवेळा वयाचा पुरावा नसल्याने मतदारयादीत महिलांचे नाव येत नाही. ग्रामीण भागात ही समस्या प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे मतदार नोंदणी करण्यासाठी प्रशासनाने वयाच्या पुराव्यासाठीही विविध पर्याय खुले केले होते. वर्षभर राबविलेल्या या कार्यक्रमाला यश आले असून, सध्या जाहीर झालेल्या मतदार यादीत पुरुषांच्या तुलनेत ९१३ महिला मतदारांनी नोंदणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत प्रशासनाने मतदार नोंदणीचा कार्यक्रम राबविला. महिला मतदारांच्या नोंदणीबरोबरच १८ ते १९ वर्षे वयोगटातील जास्तीत जास्त नवमतदारांची नोंदणी करण्यात आली. त्यामुळे मतदारयादीत नवमतदारांची संख्याही वाढली आहे. जवळपास ३० हजार ५०० नवमतदारांनी नावनोंदणी केली आहे. (प्रतिनिधी)