तपासणीच्या नावाखाली मनमानी करणा-या रेल्वे अधिका-यांवर कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 02:50 PM2017-11-09T14:50:30+5:302017-11-09T19:07:03+5:30
दक्षिण मध्य रेल्वेतर्फे २ नोव्हेंबर रोजी औरंगाबादेत फुकट्या रेल्वे प्रवाशांवर कारवाईच्या नावाखाली अधिका-यांच्या दंडेलशाहीला तिकीट काढून प्रवास करणा-यांना सामोरे जावे लागले.
औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेतर्फे २ नोव्हेंबर रोजी औरंगाबादेत फुकट्या रेल्वे प्रवाशांवर कारवाईच्या नावाखाली अधिका-यांच्या दंडेलशाहीला तिकीट काढून प्रवास करणा-यांना सामोरे जावे लागले. ही दंडेलशाही रेल्वे अधिका-यांना चांगलीच महागात पडणार असून, याप्रकरणी संबंधित कर्मचारी-अधिका-यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ‘दमरे’चे प्रिन्सिपल चीफ कमर्शियल मॅनेजर एम.जी. शेखरम यांनी दिली.
रेल्वेस्टेशनवर बुधवारी (दि.८) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शेखरम यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. फुकट्या प्रवाशांबरोबर जनरल तिकीट असताना स्लीपर बोगीतून प्रवास करणा-यांचे प्रमाण अधिक आहे. अनधिकृत विक्रेते फिरतात. याविषयी तक्रारी आल्याने कारवाई केली जात आहे. रेल्वेमध्ये एकूण ९ प्रकारे तपासणी केली जाते. २ नोव्हेंबर रोजी औरंगाबादेत कारवाई करण्यात आली. ४२ तिकीट निरीक्षक, ९ रेल्वे सुरक्षा बलाचे जवान यांच्या मदतीने फुकट्या प्रवाशांवर कारवाई झाली; परंतु नियमानुसार तिकीट काढून प्रवास करणा-यांना कोणताही त्रास होणार नाही, याची कोणतीही खबरदारी अधिका-यांनी घेतली नाही.
असभ्य भाषेत प्रवाशांकडे तिकिटांची विचारणा करण्यात आली. प्रवाशांची अक्षरश: कॉलर धरून सराईत गुन्हेगारांप्रमाणे त्यांना ओढून नेले. माध्यमांच्या छायाचित्रकारांनाही या कारवाईचे छायाचित्र घेण्यापासून मज्जाव केला. हा प्रकार ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून समोर आणला. अखेर या सर्व प्रकारांविषयी खेद व्यक्त करीत हा प्रकार करणा-यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शेखरम यांनी दिली. यावेळी स्टेशन व्यवस्थापक लक्ष्मीकांत जाखडे, धनंजयकुमार सिंग उपस्थित होते.
पाच मिनिटांत रांगेतून जावे...
तिकीट घेण्यासाठी प्रवाशांना रांगेत ब-याच वेळ थांबावे लागते. त्यातून रेल्वे सुटण्याचे प्रकार होतात; परंतु तिकीट घेण्यासाठी ५ मिनिटांवर कोणीही रांगेत उभे राहू नये, अशी व्यवस्था करण्यावर भर आहे. कर्मचारी संख्या अपुरी पडत असल्याने निवृत्त कर्मचा-यांना घेण्याचा निर्णय घेतला आहे. रोख रकमे व्यतिरिक्तची कामे ते करतील, अशी माहिती शेखरम यांनी दिली.
५०५ जणांवर कारवाई
औरंगाबादेत विनातिकीट ४३७ प्रवाशांवर, तर अतिरिक्त सामान, अनधिकृत विक्रेते अशा एकूण ५०५ जणांवर कारवाई करण्यात आली. यातून १ लाख ४९ हजार ६३५ रुपयांचा दंड वसूल झाला. अशाप्रकारे कारवाई क रण्यासाठी रेल्वेतून प्रवास करण्याची मुभा अधिका-यांना आहे. कोणत्याही प्रकारे अतिरिक्त खर्च करण्यात आला नसल्याचे शेखरम यांनी सांगितले.