मृत्यूचा सापळा बनलेल्या पडेगाव रोडला नगर नाका-मिटमिट्यापर्यंत पर्यायी रस्ता उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 03:59 PM2017-12-28T15:59:38+5:302017-12-28T16:04:52+5:30
पडेगावच्या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण हलका करण्यासाठी पर्यायी रस्ता तयार करणे अत्यावश्यक झाले आहे. मनपाने शंभर फूट रस्त्याचे उर्वरित भूसंपादन करून त्वरित कच्चा रस्ता तरी सुरू करायला हवा.
औरंगाबाद : पडेगाव येथील अरुंद रस्त्यामुळे महिन्यातून एक किंवा दोन निष्पाप नागरिकांचे रक्त सांडत आहे. बीड बायपासप्रमाणेच हा रस्ताही मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या रस्त्याला शंभर फूट पर्यायी रस्ताही उपलब्ध आहे. महापालिकेने या रस्त्याचे ९० टक्के भूसंपादनही करून ठेवले आहे. पडेगावच्या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण हलका करण्यासाठी पर्यायी रस्ता तयार करणे अत्यावश्यक झाले आहे. मनपाने शंभर फूट रस्त्याचे उर्वरित भूसंपादन करून त्वरित कच्चा रस्ता तरी सुरू करायला हवा.
मागील दहा वर्षांत नगर नाका ते मिटमिटापर्यंत अनेक नागरी वसाहती निर्माण झाल्या आहेत. दौलताबाद किल्ला, ऐतिहासिक खुलताबादनगरी, म्हैसमाळ, वेरूळ येथे जाणारे पर्यटक वैजापूर रोडचाच वापर करतात. याशिवाय बाहेरगावी जाणार्या वाहनधारकांची संख्या वेगळीच. अवघ्या ३० फुटांचा हा रस्ता आता वाहनधारकांना अपुरा पडतो. सकाळी आठ ते रात्री बारापर्यंत या रस्त्यावर प्रचंड वर्दळ असते. या रस्त्यावर दररोज एक तरी लहान-मोठा अपघात होतो. आतापर्यंत असंख्य निष्पाप नागरिकांचे जीव या रस्त्यावर गेले आहेत. पडेगाव येथील ख्रिश्चन समाजाच्या कब्रस्तानापासून पेट्रोलपंपापर्यंत दाट लोकवस्ती असल्याने दिवसभर रस्त्यावर वर्दळ असते. त्यात दुचाकी, चारचाकी आणि मोठ्या वाहनांना रस्ता ओलांडण्याची प्रचंड घाई झालेली असते.
गर्दीतून वाहनधारक अशा पद्धतीने पुढे जातात की, पाहणार्याचे मन हेलावून जाते. अनेकदा या रस्त्यावर वाहतुकीचा खेळखंडोबा होतो. दौलताबाद आणि खुलताबादकडे जाणारी वाहने अतिशय वेगाने ये-जा करतात. कुठेच गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगाने येतात. अचानक कोणी समोर आल्यास वाहनचालकाला ताबा मिळविणे अवघड असते. यातूनच अपघात होत आहेत. नगर नाका ते मिटमिटा हा रस्ता सध्या फक्त ३० फुटांचा असून, त्याला किमान शंभर फूट करणे गरजेचे आहे.
आराखड्यानुसार भूसंपादन
मागील पाच ते सात वर्षांमध्ये महापालिकेने पडेगाव भागात सर्वाधिक टीडीआर दिले आहेत. २००२ च्या शहर विकास आराखड्यानुसार १०० फूट रुंद रस्त्यात ज्या नागरिकांची जमीन गेली त्यांनी टीडीआरच घेतले आहेत. ९० टक्के रस्त्याचे भूसंपादन झाले आहे. दहा टक्के भूसंपान केल्यास पडेगावला पर्यायी मार्ग तयार होऊ शकतो. सुरुवातीला रस्त्याचे मार्किंग करून मनपाने कच्चा रस्ता तयार केला तरी नागरिक त्याचा वापर करू शकतील.