डॉक्टर भावाला गतिमंद भावाची किडनी दान करण्याची परवानगी औरंगाबाद खंडपीठाने नाकारली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 12:37 PM2017-12-21T12:37:09+5:302017-12-21T12:38:38+5:30
दोन्ही किडन्या निकामी झालेल्या डॉक्टर भावाला गतिमंद भावाची जुळणारी किडनी देण्याच्या परवानगी मागणारी याचिका आज खंडपीठाने फेटाळली. वैद्यकीय अहवाल व न्यायालयातील प्रत्यक्ष मुलाखतीच्या आधारावर न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी हा निर्णय दिला.
औरंगाबाद : दोन्ही किडन्या निकामी झालेल्या डॉक्टर भावाला गतिमंद भावाची जुळणारी किडनी देण्याच्या परवानगी मागणारी याचिका आज खंडपीठाने फेटाळली. वैद्यकीय अहवाल व न्यायालयातील प्रत्यक्ष मुलाखतीच्या आधारावर न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी हा निर्णय दिला.
अवयवदान विषयक कायद्यातील कलम ९ (सी) नुसार गतिमंद व्यक्तीच्या अवयव दानास प्रतिबंध आहे. यामुळे दोन्ही ‘किडन्या’ निकामी झालेल्या २८ वर्षांच्या डॉक्टरच्या संपूर्ण कुटुंबाने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. यावर सुनावणी करताना गतिमंद दात्याचा वैद्यकीय अहवाल व न्यायालयातील प्रत्यक्ष मुलाखत यावरून दाता अवयव दानास सक्षम नसल्याचे मत नोंदवत न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी याचिका फेटाळली.
काय होती याचिका
नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील येथील डॉ. अतुल पवार या डॉक्टरच्या दोन्ही ‘किडन्या’ निकामी झालेल्या आहेत. त्यांच्या एका भावाच्या किडन्या डॉ. अतुलशी जुळतात. म्हणून पवार कुटुंब औरंगाबादला बजाज रुग्णालयात आले आहे. मात्र, डॉ. अतुलचा ‘तो’ भाऊ गतिमंद असल्यामुळे रुग्णालयातील अवयवदानविषयक समितीने गतिमंद दात्याचे अवयवदान करण्यास ‘ह्युमन आॅर्गन अॅन्ड टिश्यूज ट्रान्सप्लान्ट अॅक्ट’ १९९४ च्या कलम ९ (१) नुसार प्रतिबंध असल्याचे कारण दर्शवून त्या दात्याची पुढील वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिला. यामुळे डॉ. अतुलचे वडील गणपतराव संभाजीराव पवार यांनी अॅड. पी.के. जोशी यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.
पवार यांचे दुर्दैव
किडनीदान कायद्याच्या फेर्यात अडकलेल्या डॉ. अतुलच्या दोन्ही किडन्या निकामी (फेल) झालेल्या आहेत. वडील ७० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असल्यामुळे ते किडनीदान करूशकत नाहीत. डॉ. अतुलच्या एका बहिणीला आईने किडनीदान केल्यामुळे आई एकाच किडनीवर जिवंत आहे. तसेच त्यांच्या ज्या बहिणीला ती ३ वर्षांची असताना आईने किडनीदान केले होते. तिच्याही दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. ज्या भावाच्या किडन्या अतुलशी जुळतात तो गतिमंद असल्यामुळे कायद्यानुसार त्याचे किडनीदान होऊ शकत नाही, तर शिक्षक असलेल्या भावाच्या किडन्या अतुलशी जुळत नाहीत हे दुर्दैव म्हणावे लागेल.