औरंगाबादेत यंदाच्या दिवाळीत सोने चमकलेच नाही; ५० हजारांपेक्षा अधिक किमतीचे सोने खरेदी करण्याची ग्राहकांना भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:08 PM2017-10-25T13:08:44+5:302017-10-25T13:10:00+5:30
यंदाच्या दिवाळीत नोटाबंदी, जीएसटी आणि पन्नास हजारच्यावर सोने खरेदी के ल्यास विविध चौकशींना सामोरे जावे लागते की काय, या भीतीमुळे अनेकांनी सराफा बाजारात फिरकण्याचेच टाळले. त्यामुळे ऐन दिवाळीतही सोने चमकलेच नाही.
औरंगाबाद : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दिवाळी पाडव्याचा मुहूर्त आणि धनत्रयोदशी या दोन दिवशी जमेल तसे सोने घेण्याकडे विशेषत: महिला वर्गाचा आतापर्यंत कल दिसून यायचा. या मुहूर्तावर एखाद्या तरी लहान-मोठ्या सोन्याच्या दागिन्याची खरेदी करून महिलांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित व्हायचा. मात्र यंदाच्या दिवाळीत नोटाबंदी, जीएसटी आणि पन्नास हजारच्यावर सोने खरेदी के ल्यास विविध चौकशींना सामोरे जावे लागते की काय, या भीतीमुळे अनेकांनी सराफा बाजारात फिरकण्याचेच टाळले. त्यामुळे ऐन दिवाळीतही सोने चमकलेच नाही.
नोटाबंदी, जीएसटीमुळे नागरिकांच्या खिशात खुळखुळणा-या पैशांचा आवाज जरा कमीच झालेला आहे. याचा परिणाम सोने खरेदीवर प्रामुख्याने दिसून आला. याविषयी अधिक सांगताना सराफा व्यापारी म्हणाले की, मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत केवळ ३०-३५ टक्के एवढीच सोने खरेदी झाली. त्यातही केवळ पाडवा आणि धनत्रयोदशी या दोन दिवशीच तुरळक ग्राहक आले होते. या ग्राहकांपैकी बहुतांश ग्राहकांनी सोन्याची किरकोळ खरेदी केली. मोठा दागिना घेणारे ग्राहक अपवादानेच आढळून आले. त्यातही ज्यांच्या घरी दिवाळीनंतर लग्नकार्य आहे, अशाच ग्राहकांनी दिवाळीत सोने खरेदीत रस दाखविला आणि मोठ्या दागिन्यांची खरेदी केली.
एकावेळी पन्नास हजारपेक्षा अधिक सोने खरेदी करणा-या ग्राहकांची चौकशी करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आल्यामुळे या गोष्टीचीही जणू ग्राहकांच्या मनात भीती बसली आहे. अधिकचे सोने घेऊन वेगवेगळ्या चौकशींना सामोरे जाण्यापेक्षा सोने न घेतलेलेच बरे अशी अनेक ग्राहकांची धारणा झाल्यामुळे दिवाळीत सराफा थंडावल्याची प्रतिक्रिया अनेक व्यापा-यांनी दिली.
सोने ‘गुंतवणूक’ राहिले नाही
नोटाबंदी आणि एकूणच देशामध्ये अर्थविषयक झालेल्या विविध बदलांमुळे गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करणे जवळपास बंद झाले आहे. पूर्वी जसा पैसा येईल, तसे महिला गुंतवणूक म्हणून सोने घेऊन ठेवायच्या. त्यामुळे दिवाळी, दसरा अशा मुहूर्तावर आवर्जून सोने खरेदी केली जायची. आता मात्र सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहणे बंद झाल्यामुळे दिवाळीच्या धामधुमीतही सराफा थंडच राहिला.