भोकरदन नाका ते मोंढा परिसर अंधारात
By Admin | Published: November 10, 2014 11:34 PM2014-11-10T23:34:32+5:302014-11-10T23:50:44+5:30
जालना : येथील नवीन मोंढा मार्गावर भरधाव वेगातील ट्रकने विजेच्या खांबाला रविवारी सायंकाळी ६ वाजता धडक दिली. त्यामुळे विजेच्या तारा तुटल्या
जालना : येथील नवीन मोंढा मार्गावर भरधाव वेगातील ट्रकने विजेच्या खांबाला रविवारी सायंकाळी ६ वाजता धडक दिली. त्यामुळे विजेच्या तारा तुटल्या. खांब वाकला. रात्री ८ वाजेपासून तक्रारी सुरू झाल्या. मात्र वीज कंपनीने काहीच दखल घेतली नाही. परिणामी दोन मोठ्या दवाखान्यांसह ८०० घरांचा वीज पुरवठा बंद आहे.
भोकरदन नाका ते मोंढा हा तीन किलोमीटरचा रस्ता आहे. सकलेचानगर चौकात संपूर्ण रस्ताच खचलेला आहे. या रस्त्यावरून वाहने चालविणे मोठे आव्हान आहे. खड्डे चुकवितांना ट्रक चालकाचा अंदाज चुकला. भरधाव वेगातील हा ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर जाऊन आदळला. हा खांब वाकला. विजेच्या ताराही तुटल्या. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. मात्र रविवारपासून गायब झालेली वीज पुन्हा परतली नाही.
बहुतांश घरांना पालिकेचा पाणीपुरवठा नाही. निम्म्याहून अधिक कुटूंबांना बोअरिंगच्या पाण्यावर विसंबून राहावे लागते. त्यांची भटकंती सुरू असून टँकरने आणलेले पाणीही टाकीत भरणे जिकरीचे झाले आहे. त्यासाठीही वीज पुरवठा आवश्यक आहे.
दोन दवाखाने या वीज वाहिनीवर आहेत. वीज पुरवठा बंद असल्याने दवाखान्याचे प्रशासनही अडचणीत सापडले आहे. (प्रतिनिधी)