भुजल पातळीत तब्बल २.१५ मीटरने घट
By Admin | Published: February 21, 2016 11:53 PM2016-02-21T23:53:08+5:302016-02-21T23:55:44+5:30
बालासाहेब काळे, हिंगोली सततच्या अवर्षणाचा सामना करीत असलेल्या हिंगोली जिल्ह्यात मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा जानेवारी अखेर भुजल पातळीत तब्बल २.१५ मीटरने घट झाली आहे.
बालासाहेब काळे, हिंगोली
सततच्या अवर्षणाचा सामना करीत असलेल्या हिंगोली जिल्ह्यात मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा जानेवारी अखेर भुजल पातळीत तब्बल २.१५ मीटरने घट झाली आहे. येत्या महिनाभरात साधारणत: दीडशे गावांमध्ये जलसंकट अधिक गडद होणार असल्याची चिन्हे आहेत.
भुजल सर्वेक्षण यंत्रणा विभागाने हिंगोली जिल्ह्याची पाणी पातळी मोजण्यासाठी ५५ विहिरी निश्चित केल्या आहेत. साधारणत: तीन महिन्याच्या अंतराने या निरीक्षण विहिरींतील पाण्याची पातळी वाढली किंवा कमी झाली आहे काय? हे पाहण्यासाठी जलपातळी मोजली जाते. सध्या ऊन वाढू लागल्याने फेब्रुवारीतच टंचाईच्या झळा अधिक तीव्र होत आहेत. जानेवारी अखेर भूजल सर्वेक्षण विभागाने निरीक्षण विहिरीतील पाणीपातळी मोजली असता जिल्ह्याच्या भुजल पातळीत सरासरी २.१५ मीटरने घट झाल्याचे दिसून आले. यात औंढा तालुक्याची पाणी पातळी २.३९ मी., वसमत तालुका- २.३५, हिंगोली तालुका- १.२०, कळमनुरी तालुका १.५७ आणि सेनगाव तालुक्याची पाणी पातळी २.१६ मीटरने खालावली आहे. यावर्षी हिंगोली व कळमनुरी तालुक्याच्या भूजल पातळीत प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. एप्रिल, मे महिन्यात ही पातळी आणखी खोल जाण्याची शक्यता आहे. शिवाय यापुढे दोन महिन्याच्या कालावधीत नदी-नाले, विहिरी, तलाव कोरडे पडतात. यामागे जिल्ह्यातील नागरिकांना यावर्षी भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान जिल्हा प्रशासनाने जवळपास १० गावांमध्ये जानेवारी अखेर टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे. येलदरी धरणात ४६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. सिद्धेश्वर धरणाचा जीवंत साठा संपला असून त्यात केवळ १६९.८९ दलघमी म्हणजे १८.९९ टक्के पाणी शिल्लक आहे. इसापूर धरणात १८३.०४ दलघमी पाणी उपलब्ध आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाणी पातळी तपासणीचा अहवाल प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे. दरम्यान सेनगाव तालुक्यातील ४५, औंढा तालुक्यातील ३०, हिंगोली तालुक्यातील २६, कळमनुरी तालुक्यातील २५ आणि वसमत तालुक्यातील २० गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.