प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 12:44 AM2017-11-09T00:44:00+5:302017-11-09T00:44:04+5:30
तीन महिन्यांपूर्वी एका प्रेमप्रकरणावरुन झालेल्या वादानंतर दत्तनगर येथील ओमकार प्रभाकर अल्लाकोंडे (वय २३) या तरुणाचा त्याच्याच तीन मित्रांनी चाकूने भोसकून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री उजेडात आली़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: तीन महिन्यांपूर्वी एका प्रेमप्रकरणावरुन झालेल्या वादानंतर दत्तनगर येथील ओमकार प्रभाकर अल्लाकोंडे (वय २३) या तरुणाचा त्याच्याच तीन मित्रांनी चाकूने भोसकून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री उजेडात आली़ याप्रकरणी वजिराबाद पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे़
ओमकार अल्लाकोंडे हा तरुण रेल्वेस्थानक परिसरातील बाळू पवार यांच्या हेअर कटिंग सलूनमध्ये काम करीत होता़ त्याचवेळी त्याची ओळख प्रवीण लोका या तरुणाशी झाली़ मंगळवारी सकाळी ओमकार हा सकाळपासून त्याचा भाऊ वाहनचालक शैलेश अल्लाकोंडे याच्याबरोबर चारचाकी वाहनाच्या पासिंगसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात होता़ दुपारी दोन वाजेच्या सुमारास ओमकार घराकडे निघाला होता़, परंतु रात्री साडेआठ वाजेपर्यंत तो घरी न आल्यामुळे ओमकारचा भाऊ शैलेश याने त्याचा शोध सुरु केला़ अण्णाभाऊ साठे चौकात शैलेशला ओमकारचा मित्र प्रवीण लोका भेटला़
यावेळी लोका याने ओमकारचे मित्र नरेश, अशोक व अन्य एक असे तिघे जण त्याला घेवून बोलण्यासाठी दुचाकीवर बसवून घेवून गेल्याचे सांगितले़ तसेच ओमकार व नंदीग्राम सोसायटीमधील नरेश या मुलाचा तीन महिन्यांपूर्वी एका मुलीवरुन वाद झाल्याचेही लोका यांनी शैलेश अल्लाकोंडे यांना सांगितले़ त्यानंतर शैलेश याने ओमकारला मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़, परंतु त्याचा फोन बंद येत होता़ त्यानंतर शैलेश याने रेल्वेस्थानक परिसरात शोध घेतला असता फटाका मार्केटच्या मोकळ्या मैदानावर ओमकारचे प्रेत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले़
ओमकारच्या पोटावर, छातीवर व हातावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्याचा खून केला होता़ याप्रकरणी शैलेश अल्लाकोंडे यांच्या तक्रारीवरुन नरेश, अशोक व अन्य एका जणाविरुद्ध वजिराबाद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविला़