शाळांतील संगणक कक्ष धूळ खात पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:25 AM2017-11-10T00:25:30+5:302017-11-10T00:25:36+5:30
विद्यार्थ्यांना बदलत्या काळात खाजगी शाळांच्या स्पर्धेत टिकता यावे, संगणक ज्ञानातही ते मागे राहू नयेत, यासाठी अनेक शाळांत संगणक कक्ष दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : विद्यार्थ्यांना बदलत्या काळात खाजगी शाळांच्या स्पर्धेत टिकता यावे, संगणक ज्ञानातही ते मागे राहू नयेत, यासाठी अनेक शाळांत संगणक कक्ष दिले आहेत. मात्र त्यातील बहुतांश बंदच आहेत. त्यामुळे या संगणकांची दुरुस्ती करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिल्यास त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात जि.प.च्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शासन योजनेसह खासदार, आमदारांच्या निधीतून अनेक ठिकाणी संगणक कक्ष उभारणी केली होती. यात बहुतेक शाळा या माध्यमिकच्या आहेत. मात्र हे संणगक कालओघात बंद पडले आहेत. काही ठिकाणी या मुलांना शिक्षण देण्यासाठी संगणक शिक्षक होते. नंतर त्यांनाही सर्व शिक्षातील तरतूद बंद झाल्याने कमी करण्यात आले. त्यामुळे हे संगणक धूळ खात पडले. तर इतर शिक्षकांना फारसे संगणक ज्ञानच नसल्याने त्यांनीही कधी धूळ झटकण्याचा प्रयत्न केला नाही. आता यातील किती संगणक वापरण्यायोग्य उरले हाही शोधाचाच विषय आहे. बोटावर मोजण्याइतक्या शाळांत मात्र ही यंत्रणा कार्यान्वित आहे. मात्र या संगणकांची दुरुस्ती केल्यास अनेक शाळांमध्ये पुन्हा निदान संगणक साक्षरतेचे काम तरी करणे शक्य आहे.