संविधान हाच आमचा चेहरा; हाच चेहरा घेऊन आगामी निवडणुका लढवू : कन्हैयाकुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 07:41 PM2018-08-27T19:41:13+5:302018-08-27T19:42:34+5:30
संविधान हाच आमचा चेहरा असून, हाच चेहरा घेऊन आम्ही आगामी निवडणुका लढवू
औरंगाबाद : संविधान हाच आमचा चेहरा असून, हाच चेहरा घेऊन आम्ही आगामी निवडणुका लढवून भाजपसारख्या मनुवादी पक्षाला हरवणार असल्याचा विश्वास भाकपच्या राष्ट्रीय कौन्सिलचे सदस्य व लोकप्रिय युवक नेते कन्हैयाकुमार यांनी व्यक्त केला. ते रविवारी औरंगाबादहून दिल्लीला रवाना होण्यापूर्वी पत्रकारांशी बातचीत करत होते.
२४ आॅगस्टपासून मराठवाड्यात विविधजाहीर सभांना संबोधित करून दुपारी कन्हैयाकुमार औरंगाबादेत आले होते. एका हॉटेलमध्ये जुने कम्युनिस्ट कार्यकर्ते जयमलसिंग रंधवा यांनी स्वागत केले व तेथेच कन्हैयाकुमार यांनी दिल्लीला जाण्यापूर्वी पत्रकारांशी बातचीत केली. पंतप्रधान निवडणे म्हणजे वर्गाचा मॉनिटर निवडण्यासारखे नाही. त्यामुळे चेहऱ्याच्या राजकारणावर आमचा विश्वास नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
आरक्षणाच्या मुद्यावर कन्हैयाकुमार म्हणाले की, पाच हजार वर्षांपासून आर्थिक निकषावरच आरक्षण चालू आहे. अंबानीच्या मुलाला त्याच्या संपत्तीसाठी वेगळा अर्ज थोडाच करावा लागतो, ती संपत्ती दुसऱ्याला थोडीच मिळते, ती त्यालाच मिळते. हे आरक्षणच आहे. बीपीएलसाठी रेशन दिले जाते, हेही एक प्रकारचे आरक्षणच आहे. यावेळी डॉ. भालचंद्र कानगो, राम बाहेती, अभय टाकसाळ, अश्फाक सलामी आदींची उपस्थिती होती.
प्रधानमंत्री नव्हे, तर प्रचारमंत्री..
नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री नव्हे, तर प्रचारमंत्री आहेत, या आरोपाचा त्यांनी आज पुनरुच्चार केला. यासंदर्भात त्यांनी सांगितले की, ते पूर्णवेळ प्रचारमंत्री आहेत. देश-विदेशात जाऊनही ते प्रचाराचे काम चालूच ठेवतात. कुठल्याही योजना जमिनीशी जोडल्या गेलेल्या असाव्यात आणि त्याचे केवळ श्रेयासाठी मार्केटिंगही व्हायला नको; पण मोदी सतत मार्केटिंगमध्येच व्यस्त असतात; पण दुसरीकडे संविधानावर हल्ला होत असताना, ते जाळले असताना ते ब्र सुद्धा काढत नाहीत. उलट संविधानाची बाजू मांडणाऱ्यांना चूप केले जात आहे आणि संविधान जाळणाऱ्यांना संरक्षण दिले जात आहे. आज देशात गरीब- श्रीमंत ही दरी वाढत आहे. श्रीमंत श्रीमंतच होत चालला आहे. यावर मोदी कधी काही बोलत नाहीत.