सुपारी होती पाय तोडायची, मात्र आरोपींनी घेतला जीवच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 06:26 PM2018-03-06T18:26:19+5:302018-03-06T18:27:42+5:30
हॉटेल व्यावसायिक शेरखान यांच्यावर लोखंडी पाईपने हल्ला करणार्या मुख्य आरोपीला बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना रविवारी रात्री यश आले.
औरंगाबाद : हॉटेल व्यावसायिक शेरखान यांच्यावर लोखंडी पाईपने हल्ला करणार्या मुख्य आरोपीला बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना रविवारी रात्री यश आले. मुख्य आरोपीने पाय तोडायची सुपारी दिली होती मात्र आरोपींनी शेरखान यांचा जीवच घेतल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.
शेख सरताज शेख नासेर ऊर्फ अज्जीदादा (२५, रा. युनूस कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. शेरखान यांच्या खूनप्रकरणी आतापर्यंत अटक झालेल्या आरोपींची संख्या ९ झाली आहे. याप्रकरणी मुन्ना बोचरा हा पसार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गुन्हे शाखा पोलिसांनी सांगितले की, छावणी परिसरातील रहिवासी, हॉटेल व्यावसायिक शेरखान यांच्यावर लोखंडी पाईपने हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला होता. २७ डिसेंबरच्या रात्री झालेल्या या खुनाचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस करीत आहेत. पूर्व वैमनस्यातून आणि प्लॉटिंगच्या वादातून शेरखान यांची सुपारी देऊन हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
सुपारी देणार्या अक्रम खानसह आरोपी शेख अश्फाक, आकाश पडूळ ऊर्फ शेरा यांना २ मार्च रोजी पोलिसांनी अटक केली. या आरोपींचे पसार असलेले साथीदार शेख सरताज आणि मुन्ना बोचरा यांचा शोध पोलीस घेत होते. रविवारी रात्री सरताज हा घरी आल्याची माहिती खबर्याने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे, उपनिरीक्षक विजय जाधव, सहायक उपनिरीक्षक नसीम खान, कर्मचारी सुरेश काळवणे, समद पठाण, रमेश भालेराव, प्रदीप शिंदे, भाऊसिंग चव्हाण, संदीप बीडकर यांनी रात्रीच आरोपीच्या घरावर धाड मारून त्यास पकडले. सरताज आणि अन्य आरोपींनी शेरखान यांच्यावर पाळत ठेवून त्यांचा खून केला होता. शेरखान हे वादग्रस्त प्लॉटस् आणि जमीन खरेदी-विक्र ी आणि हॉटेलचा व्यवसाय करीत. जमीन व्यवहारात त्यांचे अनेकांशी वाद झाले होते. शिवाय शेरखान याच्या विरोधातही विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे पोलिसांत दाखल होते.
आणखी एकास पोलीस कोठडी
छावणीतील शेरखान यांच्या खून खटल्यात पोलिसांनी अटक केलेला आणखी एक आरोपी शेख सरताज ऊर्फ अज्जीदादा शेख नसीर (२५), रा. युनूस कॉलनी, कटकटगेट याला ८ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सोमवारी (दि.५ मार्च) दिले.
दरम्यान, रविवारी अटक केलेल्या तीन आरोपींना न्यायालयाने ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली. अक्रमखान गयाज खान (२७, रा. जटवाडा), शेख अश्फाक शेख इसाक (२५, रा. शहाबाजार) आणि आकाश पडूळ ऊर्फ शेर्या (२२, रा. जिन्सी परिसर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
पाय तोडायचे आदेश... आरोपींनी घेतला जीवच...
तपास अधिकार्यांनी सांगितले की, शेरखान हे कोणत्याही व्यवहारात आडवे येत असल्याने अक्रम खान गयाज खान याने अन्य आरोपींना त्यांचे पाय तोडण्याची सुपारी दिली होती. मात्र आरोपींनी त्यांचे पाय तोडण्याऐवजी त्यांच्या डोक्यावर लोखंडी पाईपने हल्ला करून त्यांचा खूनच केल्याचे तपासात समोर आले.