लाखो रुपयांना गंडा घालणा-या एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध गुन्हा
By Admin | Published: April 22, 2017 05:21 PM2017-04-22T17:21:07+5:302017-04-22T17:21:07+5:30
दोन वेगवेगळ्या क्रमांकाचे भूखंड वृद्धाला विक्री करून ११लाख ५०हजाराचा गंडा घातल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील तीन जणांसह चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 22 - गारखेडा परिसरातील (सर्व्हे नंबर ४२)गणेशनगर येथील दोन वेगवेगळ्या क्रमांकाचे भूखंड वृद्धाला विक्री करून ११लाख ५०हजाराचा गंडा घातल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील तीन जणांसह चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
गंगासागर दगडू शिंदे, दगडू शिंदे, महेश शिंदे आणि सुरेश केशवराव राठोड अशी आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार शेषराव वर्जू राठोड(६२,रा. जिजामाता कॉलनी, जयभवानीनगर) यांना भूखंड खरेदी करायचा असल्याचे त्यांनी त्यांचा पुतण्या सुरेश केशवराव राठोड यास सांगितले.
त्याने आरोपी गंगासागर शिंदे, दगडू शिंदे आणि महेश शिंदे यांच्या मालकीचे गणेशनगर येथील प्लॉट क्रमांक ११२, १०१ विक्री असल्याचे सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांना आरोपींनी दोन्ही भूखंड दाखवले. हे भूखंड पसंत पडल्याने तक्रारदार यांनी भूखंड खरेदी करण्याची तयारी दर्शविली. यावेळी त्यांच्यात ११लाख ५० हजार रुपयांत या भूखंडाचा सौदा झाला. २१ मे २०१५ रोजी आरोपींना पैसे दिल्यानंतर त्यांनी तक्रारदार यांच्या नावे हेदोन्ही भूखंड कायमस्वरुपी विक्री केल्याबाबतचे नोटरी नोंदणीकृत खरेदीखत करून दिले.
हा व्यवहार झाल्यानंतर काही दिवसाने तक्रारदार यांच्या दोन्ही भूखंडावर दुस-याच व्यक्तींनी ताबा घेतल्याचे त्यांना समजले. यामुळे तक्रारदार यांनी ताबा घेणा-याना याविषयी जाब विचारला असता त्यांनी ते दोन्ही भूखंड त्यांच्याच मालकीची असल्याचे आणि त्याबाबतचे कागदपत्रे त्यांनी त्यांना दाखविले. त्यानंतर तक्रारदार यांनी आरोपींकडे पैशांची मागणी केली असता त्यांनी पैसे आज देतो, उद्या देतो असे केले. पुतण्या सुरेश याच्या मदतीने उर्वरित आरोपींनी आपल्याला दुसºयाच्या भूखंडाची बनावट कागदपत्रे दाखवून फसवणुक केल्याचे समजले. याप्रकरणी त्यांनी २१ एप्रिल रोजी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.पोलीस उपनिरीक्षक चासकर तपास करीत आहेत.