मोबाईलसाठी धावत्या रेल्वेच्या दारातून ओढल्याने प्रवाशाचा खाली पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:18 AM2019-04-27T00:18:45+5:302019-04-27T19:06:43+5:30
रेल्वेरुळावरील खडी आणि दगडांवर तो जोराने आदळल्याने त्याला गंभीर दुखापत झाली होती
औरंगाबाद : प्रवाशांचा मोबाईल हिसकावणाऱ्या गँगने धावत्या रेल्वेच्या दारात बसून मोबाईलवर बोलणाऱ्या तरुण प्रवाशाला खाली ओढून पाडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना उस्मानपुरा परिसरातील रेल्वेरुळावर दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. मृत तरुण हा स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी औरंगाबादेत मित्रासोबत राहत होता.
स्वप्नील शिवाजी राठोड (१९, रा. माळतोंडी, ता. मंठा, जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे. उस्मानपुरा पोलीस आणि लोहमार्ग पोलिसांनी सांगितले की, माळतोंडी येथील रहिवासी स्वप्नीलच्या मामाचे दोन दिवसानंतर लग्न असल्याने तो आणि त्याच्या दुसऱ्या मामाचा मुलगा हे शुक्रवारी दुपारी तपोवन एक्स्प्रेसने (मुंबई ते नांदेड) परतूरला जाण्यासाठी रेल्वेस्टेशन येथून बसला. रेल्वे स्थानकातून पुढील प्रवासाला निघाली. तेव्हा स्वप्नील रेल्वेच्या दारात उभा होता. कॉल आल्याने तो मोबाईलवर बोलू लागला. उस्मानपुरा परिसरातील रेल्वेगेट क्रमांक ५३ जवळून कमी वेगात गाडी जात होती. तेव्हा रेल्वेरुळावर उभे राहून रेल्वे प्रवाशांचा मोबाईल हिसकावणाऱ्या गँगमधील काहींनी अचानक स्वप्नीलच्या हातातील मोबाईल हिसकावला. हा मोबाईल हिसकावताना त्या चोरट्यांनी हात पकडून ओढल्याने स्वप्नील रेल्वेतून खाली पडला. रेल्वेरुळावरील खडी आणि दगडांवर तो जोराने आदळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडला.
प्रवाशांनी आरडाओरड केल्यामुळे सुमारे सात ते आठ मिनिटे गाडी घटनास्थळी थांबविण्यात आली. रेल्वे गार्डने घटनेची माहिती स्टेशन मास्तरला कळविली. काहींनी घटनेची माहिती उस्मानपुरा पोलिसांना कळविली. सहायक पोलीस निरीक्षक विजय घेरडे, उपनिरीक्षक कल्याण शेळके आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत स्वप्नीलसोबतच्या लोकांनी त्यास बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सायंकाळी ४.२५ वाजेच्या सुमारास स्वप्नीलचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद उस्मानपुरा पोलिसांनी घेतली असून, मोबाईल लुटमार करणाऱ्या परिसरातील आरोपींचा शोध सुरू केला.
मामाच्या लग्नासाठी जात होता गावी
स्वप्नीलच्या मामाचे दोन दिवसांनंतर लग्न आहे. शुक्रवारी रात्री हळदीचा कार्यक्रम असल्याने स्वप्नील मामाच्या मुलासोबत रेल्वेने मंठा तालुक्यातील गावी जात होता. मात्र आजच्या दुर्दैवी घटनेने मामाच्या लग्नाला आणि हळदीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची त्याची इच्छा अपूर्ण राहिली.
चोरटे झाले मोबाईलसह पसार
स्वप्नीलला खाली पाडणारे आरोपी स्वप्नीलचा मोबाईल घेऊन घटनास्थळाहून पसार झाले. घटनेपासून स्वप्नीलचा मोबाईल बंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
स्वप्नीलला व्हायचे होते अधिकारी
स्वप्नीलचे आई-वडील शेतकरी. त्याला एक लहान भाऊ आहे. अत्यंत हुशार असलेल्या स्वप्नीलला लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन अधिकारी व्हायचे होते. मंठा येथील एका महाविद्यालयात पदवी प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्यानंतर तो स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी मित्रासोबत खोली घेऊन औरंगपुरा परिसरात राहत होता. आजच्या घटनेमुळे हे स्वप्न भंगले.