एक फ्लॅट चार जणांना विकला, बिल्डर मांडे विरोधात औरंगाबादमध्ये फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 06:29 PM2018-02-23T18:29:02+5:302018-02-23T18:31:42+5:30
एकच फ्लॅट तीन जणांना विक्री केल्यानंतरही आणखी एका जणाला १२ लाखात विक्री करून फसवणुक केल्याप्रकरणी बिल्डर प्रफुल्ल मांडेविरोधात सातारा ठाण्यात आणखी एक गुन्हा पोलिसांनी नोंदविला.
औरंगाबाद : एकच फ्लॅट तीन जणांना विक्री केल्यानंतरही आणखी एका जणाला १२ लाखात विक्री करून फसवणुक केल्याप्रकरणी बिल्डर प्रफुल्ल मांडेविरोधात सातारा ठाण्यात आणखी एक गुन्हा पोलिसांनी नोंदविला. यापूर्वी बिल्डर मांडेविरोधात अनेक तक्रारी पोलिसांत दाखल झालेल्या असल्याने तो हर्सूल कारागृहात आहे.
याविषयी अधिक माहिती देताना सातारा पोलिसांनी सांगितले की, भारत दत्तराव खंदारे (४८, रा.विवेकानंदनगर, घारे कॉलनी, मंठा, जि. जालना ) यांनी बिल्डर मांडे यांच्या सुंदरवाडी येथील गट नंबर ३१ मधील वास्तुविला या अपार्टमेंटमधील फ्लॅट नंबर ए १३ हा १२ लाख ५० हजारात खरेदी केला. संपूर्ण रक्कम बिल्डरला दिल्यानंतर त्याने तक्रारदार यांच्या नावे ८ सप्टेंबर २०१६ रोजी रजिस्ट्री कार्यालयात खरेदीखत करून दिले. एवढेच नव्हे तर फ्लॅटचा ताबाही दिला. भारत खंदारे यांनी त्या फ्लॅटला कुलूप लावले. नंतर ते फ्लॅटमध्ये राहण्यास गेले असता काही दिवसाने अभिजीत सतीशकुमार बाफना, कैलास नानासाहेब पवार,गालेब सलीम हिलाबी हे तेथे आले आणि त्यांनी मांडेकडून हा फ्लॅट खरेदी केल्याचे आणि वेगवेगळ्या तारखेचे नोंदणीकृत खरेदीखत त्यांनी दाखविले. तेव्हा खंदारे यांना धक्काच बसला. आपल्याकडून साडेबारा लाख रुपये घेऊन बिल्डरने आपल्याला विक्री केलेला फ्लॅट त्याने यापूर्वी तीन जणांना विकल्याचे त्यांना समजले. शिवाय फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांनी बिल्डरला अटक के ल्याचे तक्रारदार यांना समजले. यामुळे त्यांनी सातारा ठाण्यात बिल्डर मांडेविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. पोहेकाँ दाभाडे हे तपास करीत आहे.