वाहता नाला झाला नदीसारखा आरस्पानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 01:15 AM2018-07-30T01:15:03+5:302018-07-30T01:16:38+5:30
इंदूर झाले चकाचक; औरंगाबाद का नाही : इंदूर शहरातील ३२ लाख नागरिकांच्या दररोजच्या वापरातील जवळपास ३०० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्याचे काम महापालिका करते. शहरातील एकाही नाल्यातून घाण-दुर्गंधीयुक्त पाणी वाहत नाही. नाल्यातील पाणी नदीसारखे आरस्पानी असते.
मुजीब देवणीकर
औरंगाबाद : इंदूर शहरातील ३२ लाख नागरिकांच्या दररोजच्या वापरातील जवळपास ३०० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्याचे काम महापालिका करते. शहरातील एकाही नाल्यातून घाण-दुर्गंधीयुक्त पाणी वाहत नाही. नाल्यातील पाणी नदीसारखे आरस्पानी असते. न्यूक्लिअर किरणोत्सर्गाचा वापर करून मानवी विष्ठेपासून खतनिर्मितीचा प्रकल्प सुरू होण्याच्या मार्गावर आहे.
जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा इंदूर शहरात उपलब्ध करून देण्याचा विडाच महापालिकेने उचलला आहे. शहर बससेवा, ड्रेनेज व्यवस्था, पाणीपुरवठा, पथदिवे, गुळगुळीत रस्ते, पदपथ, उद्याने, प्राणिसंग्रहालय, ठिकठिकाणी बागा, जागा मिळेल तेथे वृक्षारोपण, मानवी केसांपासून केमिकल खतनिर्मिती, अशा कितीतरी आघाड्यांवर महापालिका काम करीत आहे. ही कामे महापालिका कशी करीत असेल, असाही क्षणभर प्रश्न पडतो. या कामासाठी खूप पैसा लागतो असेही नाही. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर मार्ग आपोआप तयार होतात, हे इंदूर शहराने दाखवून दिले.
( इंदूरमध्ये शहर स्वच्छतेवर दरवर्षी १५२ कोटी खर्च )
शहरातील कबीरखेडी येथे तब्बल ३०० एमएलडी दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. हे पाणी शहरातील उद्याने हिरवीगार करण्यासाठी वापरण्यात येते. २० कोटी रुपये खर्च करून भाभा अणु संशोधन केंद्राच्या मदतीने मानवी विष्ठेपासून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. अहमदाबादनंतर हे देशातील दुसरे केंद्र ठरणार आहे.
दर्जेदार पाणीपुरवठा
इंदूर शहरात पाण्यासाठी नर्मदा नदीवर अवलंबून राहावे लागते. तब्बल ९० किलोमीटर अंतरावरून पाणी शहरात आणण्यात येते. शहरातील उंच टेकडीवर हे पाणी नेण्यात येते. तेथून कोणतेही पंपिंग न करता थेट पाणी टाक्यांमध्ये चढविण्यात येते. शहराचे दोन भाग केले असून, प्रत्येक भागाला एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. या अद्भुत पद्धतीने पाणीपुरवठ्यातील विजेचा खर्च कमी झाला आहे. औरंगाबादेतील नहर-ए-अंबरीसाठी ही सायफन पद्धत वापरली आहे.
३५० सुलभ शौचालये
इंदूर शहरातील प्रत्येक रस्त्यावर ‘पेशाब घर’ म्हणजेच शौचालये दिसतात. खाजगी संस्थांच्या माध्यमातून ‘पे अँड युज’ शौचालये उभारण्यात आली आहेत. नागरिक, महिला याचा वापर करतात. महापालिका दररोज स्वच्छता करते. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये महापालिकेने दर्जेदार सोयी-सुविधा देऊन नागरिकांच्या मनात घर केले. आता सार्वजनिक ठिकाणी कोणी कचरा टाकला तर नागरिकच त्याला रोखतात. रस्त्यावर थुंकणाऱ्यांनाही नागरिकच धडा शिकवितात.
२०० बसथांबे
शहर बससेवेसाठी मनपाने प्रमुख रस्त्यांवर आकर्षक बसथांबे तयार केले . यामध्ये बस किती वाजता येईल, याच्या वेळा डिजिटल बोर्डावर दर्शविण्यात आल्या आहेत. बस येण्यास किती वेळ आहे, हेसुद्धा प्रवाशाला पाहायला मिळते. बसथांब्यांची बांधणी अॅक्रलिक बोर्डात केली आहे. हे अॅक्रलिक बोर्ड कोणी चोरून नेत नाही, हे विशेष. महापालिकेने लावलेली प्रत्येक वस्तू ही या शहराची आहे. याचा वापर आपल्याला करावा लागतो ही जपानी नागरिकांप्रमाणे भावना प्रत्येकाच्या मनात कोरण्यात आली .