कच-यासह सभेत लागले पथदिवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 01:32 AM2017-10-17T01:32:59+5:302017-10-17T01:32:59+5:30

दिवाळीसारखा मोठा सण दोन दिवसांवर येवून ठेपला असताना शहरातील पन्नास टक्के पथदिवे बंद आहेत, अशी ओरड सोमवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केली.

Garbage and water issues in AMC's general meeting | कच-यासह सभेत लागले पथदिवे

कच-यासह सभेत लागले पथदिवे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील प्रत्येक वॉर्डात पाणीप्रश्न अत्यंत गंभीर बनला असतानाही महापालिका प्रशासन अजिबात लक्ष देत नाही. पाणी प्रश्नावरून नागरिकांचा त्रास एवढा वाढला आहे की, राजीनामा देऊन घरी बसावे असे वाटत आहे. मागील तीन दिवसांपासून कचरा न उचलल्याने प्रत्येक वॉर्डात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. दिवाळीसारखा मोठा सण दोन दिवसांवर येवून ठेपला असताना शहरातील पन्नास टक्के पथदिवे बंद आहेत, अशी ओरड सोमवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केली.
पाणीप्रश्नावर दोन तास चर्चा
सिडको-हडकोत मागील काही दिवसांपासून चार दिवसाआड, पाच दिवसाआड पाणी येत आहे. सिडको एन-५, एन-७ येथील पाण्याच्या टाकीत पाणीच पडत नाही. सिडको-हडकोच्या हक्काचे पाणी कोणाला देण्यात येत आहे. ठराविक वॉर्डांवर मनपाकडून अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप नगरसेविका माधुरी अदवंत, सीताराम सुरे, शिल्पाराणी वाडकर, मनीषा मुंढे, समीना शेख, जमीर कादरी यांनी करून प्रशासनावर बॉम्बगोळाच टाकला.
माधुरी अदवंत यांनी तर ज्या वॉर्डांना दररोज पाणीपुरवठा होतो त्या वॉर्डातील पाणीपुरवठ्याचे रजिस्टरच सभागृहात सादर करून प्रशासनाची जोरदार कोंडी केली. राजेंद्र जंजाळ यांनी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आवाहन केले. अंकिता विधाते, गोकुळ मलके, सुरेखा सानप आदींनी या चर्चेत भाग घेतला. कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी उत्तर दिले; मात्र नगरसेवकांचे समाधान झाले नाही. शेवटी ज्या वॉर्डांना पाणी येत नाही, त्यांची चौकशी शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी करावी, असे आदेश महापौरांनी दिले.
कच-याचे करायचे काय?
नारेगाव परिसरातील शेतकºयांनी विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्या शब्दाला मान देत फक्त ९० दिवसांचा अवधी दिला आहे. या कालावधीत प्रत्येक वॉर्डात कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी सोय करावी, असा सल्ला नगरसेवक राजू शिंदे यांनी दिला.
आपल्या वॉर्डातील विकास कामे न केल्यास नारेगावातून कचºयाच्या गाड्या जाऊ देणार नाही, असा इशारा नगरसेविका सुरेखा सानप यांनी दिला. शिल्पाराणी वाडकर यांनी नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी सहकार्य करण्याची हमी दिली. मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी नमूद केले की, चीन येथील एक कंपनी शहरात दाखल झाली आहे.
या कंपनीने सोमवारी सकाळी नारेगाव कचरा डेपोची पाहणी केली आहे. उद्या मंगळवारी कंपनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सादर करणार आहे. कंपनीने नारेगावच्या संपूर्ण कच-यावर प्रक्रिया करण्याची हमी दर्शविली आहे. लवकरच यात निर्णय घेण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.

Web Title: Garbage and water issues in AMC's general meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.