औरंगाबाद शहरात जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 12:16 AM2018-07-06T00:16:46+5:302018-07-06T00:17:23+5:30
जूनच्या प्रारंभी आणि मध्यात दमदार हजेरी लावून रुसलेल्या पावसाने गुरुवारी (दि.५) अखेर पुन्हा एकदा परतत शहराला सुमारे दोन तास अक्षरश: धुवून काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जूनच्या प्रारंभी आणि मध्यात दमदार हजेरी लावून रुसलेल्या पावसाने गुरुवारी (दि.५) अखेर पुन्हा एकदा परतत शहराला सुमारे दोन तास अक्षरश: धुवून काढले. शहर आणि परिसरात दुपारी २.३० वाजता पावसाला सुरुवात झाली. प्रारंभी हलक्या स्वरुपात हजेरी लावल्यानंतर जवळपास दीड तास जोरदार सरी बरसल्या. सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोसळलेल्या पावसाने शहर चिंब झाले. चिकलठाणा वेधशाळेत ४४.८ मि. मी. पावसाची नोंद झाली.
१३ दिवसांपासून पाऊस नुसता हुलकावणी देत होता. जूनच्या प्रारंभीचे दोन दिवस आणि २१ व २२ जून रोजी जोरदार पाऊस झाला होता. या पावसाने शहरातील अनेक भागांतील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची दाणादाण उडाली. परंतु त्यानंतर पावसाने पाठ फिरविली. दररोज केवळ पावसाची अधूनमधून काही मिनिटांसाठीच हजेरी लागत होती. शहरात ढगाळ वातावरणानंतर गुरुवारी पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. दुपारी २.३० वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता रिमझिम बरसणाऱ्या पावसाने ढगाच्या गडगडाटासह चांगलाच जोर धरला. जवळपास दीड तास पावसाने चांगलीच शहरात हजेरी लावली. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला. परंतु पावसाच्या हलक्या स्वरुपातील धारा सायंकाळी ५ वाजेपर्यंत कायम होत्या.
पावसाने पाठ फिरविल्यामुळे रेनकोट, छत्र्यांशिवाय नागरिक बाहेर पडत होते. त्यांची आजच्या पावसाने चांगलीच धावपळ उडाली. पावसाला सुरुवात होताच मिळेल त्या जागेचा आडोसा घेण्याची वेळ पादचारी आणि वाहनचालकांवर आली. पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करण्याची वेळ त्यांच्यावर आली. जोरदार, मध्यम आणि हलक्या स्वरुपात जवळपास सुमारे अडीच तास बरसलेल्या पावसाने वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला. शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. चांगला पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील जिल्ह्यातील ५० टक्के पेरण्या रखडल्या आहेत. आगामी काही दिवस चांगला पाऊस पडून पेरण्या करणे शक्य होणार आहे.
सातारा परिसर जलमय
जोरदार पावसामुळे सातारा परिसरातील अनेक वसाहतींकडे जाणाºया रस्त्यांवर पाणी साचले. रेणुकामाता कमान पासून ते म्हाडाकडे जाणाºया रस्त्यावर चाटे स्कूलसमोर चिखलमय रस्ता सुकला होता. आजच्या पावसाने पुन्हा हा रस्ता चिखलाने भरुन गेला आहे.
दरम्यान जोरदार पावसामुळे गेल्या आठवड्यात नारेगावच्या ज्या वसाहतींमध्ये पाणी शिरले होते, त्या भागातील नागरिकांमध्ये घबराट होती.
वेदांतनगरात झाड कोसळले
पावसामुळे वेदांतनगर परिसरात झाड कोसळले. या प्रकाराविषयी नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. तर औरंगपुरा, जालना रोडसह शहरातील सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचले. त्यातून ये-जा करताना वाहनचालक, पादचाºयांना चांगलीच कसरत करावी लागली. पावसामुळे अनेकांची वाहने बंद पडली. त्यामुळे वाहने ढकलत नेत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.