औरंगाबादेत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 12:32 AM2018-06-02T00:32:23+5:302018-06-02T00:33:27+5:30
रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर शहरासह परिसरात पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी झालेल्या जोरदार पावसाने औरंगपुरा व टाऊन सेंटर भागात पाणी साचले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर शहरासह परिसरात पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी झालेल्या जोरदार पावसाने औरंगपुरा व टाऊन सेंटर भागात पाणी साचले होते. खडकेश्वर येथे वृक्ष उन्मळून पडले. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही, तर गारखेडा, उल्कानगरीत वीजपुरवठा खंडित झाला होता. शहराचे तापमान कमाल ३९.६ व किमान २५ मिमी इतके नोंदवले गेले.
शहरात दुपारपर्यंत कडक ऊन पडले होते. घराबाहेर पडलेल्यांना उकाड्यामुळे घामाच्या धारा लागल्या होत्या. दुपारनंतर हळूहळू आकाशात ढगांची गर्दी झाली आणि सोसाट्याचा वारा सुरू झाला. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अनेक भागांत जोरदार पावसास सुरुवात झाली. असह्य झालेल्या उकाड्यापासून सुटका झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या पावसामुळे औरंगपुरा, टाऊन सेंटर व शहरातील काही सखल भागांत पावसाचे पाणी साचले होते. या पावसाचा बच्चेकंपनीने मनसोक्त आनंद लुटला. खडकेश्वर मंदिर परिसरात वृक्ष उन्मळून पडले. यात जीवित हानी झाली नसल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाºयांनी सांगितले. या पावसाने उल्कानगरी, गारखेडा व परिसरात जवळपास ३ तास वीजपुरवठा खंडित होता.
सखल भागात पाणी
शुक्रवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने अनेक भागांत व रस्त्याच्या कडेला पाणी साचले होते, तर काही नागरिकांनी पावसाचे पाणी साठविण्याचा प्रयत्न केला. औरंगाबाद जिल्ह्याची ६७५ मि.मी इतकी पर्जन्यमान सरासरी आहे. १ जून रोजी ४.३४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद होणे अपेक्षित होते; परंतु तेवढा पाऊस झाला नाही. आजवरच्या सरासरीनुसार १२.८९ मि.मी. पावसाची नोंद झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
पैठणमध्ये ४ जण गंभीर; कन्नडमध्ये ४ गायींचा मृत्यू
पैठण तालुक्यात होनोबाची वाडी येथे जवळपास सर्वच घरांवरील पत्रे उडाल्याची घटना घडली. यामुळे ४ जण गंभीर जखमी झाले, तर कन्नड येथील बसस्थानक परिसरात ४ गायींचा ंिभंतीखाली दबून मृत्यू झाला, तर फुलंब्री शहरात १५ मिनिटे गारांचा पाऊस झाला. पावसासह जोरदार वाºयामुळे वृक्ष उन्मळून पडले, तर काही विद्युत खांबही कोसळले.