औरंगाबादेत हायप्रोफाइल आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 01:07 AM2017-12-08T01:07:12+5:302017-12-08T01:07:30+5:30
औरंगाबाद : शहरातील प्रोझोन मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पोलिसांनी गुरुवारी रात्री पर्दाफाश केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील प्रोझोन मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पोलिसांनी गुरुवारी रात्री पर्दाफाश केला. दोन वेगवेगळ्या स्पा सेंटरवर एकाच वेळी मारलेल्या धाडीत तीन ग्राहक, मॅनेजरसह थायलंडहून आणण्यात आलेल्या १२ मुली, ४ ग्राहक आणि ३ मॅनेजर यांना ताब्यात घेण्यात आले.
प्रोझोन मॉलमधील पहिल्या मजल्यावर अनंतरा स्पा आणि दी स्ट्रेस हब स्पा अॅण्ड सलून या नावाने दोन स्पा सेंटर काही वर्षांपासून सुरू आहेत. या सेंटरमध्ये हायप्रोफाइल आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट चालते. ग्राहकांना विदेशी मुली पुरविण्यात येतात, अशी माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांना मिळाली. यानंतर त्यांनी लगेच महिला तक्रार निवारण मंचच्या निरीक्षक किरण पाटील, पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे, वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक बिरारी आणि विशेष शाखा, पारपत्र शाखा, सायबर क्राइम सेल अशा विविध शाखांच्या सुमारे २५ कर्मचा-यांना सोबत घेऊन रात्री ८ वाजेच्या सुमारास मॉल गाठले.
दोन्ही स्पा सेंटरवर एकाचवेळी डमी ग्राहक पाठवून तेथील गोरखधंद्याची खात्री केली अन् लगेच दोन्ही स्पा सेंटरवर छापा मारला. दी स्ट्रेस हब स्पामध्ये पाच मुली, दोन ग्राहक आणि एक मॅनेजर होता, तर अनंतरामध्ये दोन विदेशी ग्राहकांसह आठ विदेशी मुली आढळल्या. यापैकी काही जणी ग्राहकांसोबत नको त्या अवस्थेत आढळल्या. यावेळी सर्व मुलींकडे थायलंडचा पासपोर्ट मिळाला. या मुली येथे कधी आल्या आणि त्यांना कोणता व्हिसा मिळाला, याबाबतची चौकशी पारपत्र शाखा करणार असल्याचे उपायुक्त डॉ. घाडगे यांनी पत्रकारांना सांगितले. पोलिसांची ही कारवाई रात्री ८ पासून रात्री उशिरापर्यंत सुरू होती. याविषयी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अन् पोलीस अधिकाºयांनी रोखले रिव्हॉल्व्हर
अनंतरामध्ये पोलिसांनी धाड मारली तेव्हा तेथे दोन विदेशी व्यक्ती सापडले. धडधाकट बांधा असलेले हे दोन्ही आरोपी पोलिसांना हातही लावू देत नव्हते. पोलिसांनी त्यांना पकडून बाजूला घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी पोलिसांच्या हाताला हिसका दिला. त्यांना आवरण्याच्या प्रयत्नांत त्यांनी चांगलाच धिंगाणा घातला. ते आवरत नसल्याचे लक्षात येताच पोलीस उपनिरीक्षक बिरारी यांनी त्यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखले आणि गप्प केले.