अर्थसंकल्पात विद्यार्थी सुविधांकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:46 AM2018-03-20T00:46:55+5:302018-03-20T11:00:24+5:30
विद्यार्थीकेंद्रित शिक्षण देत असल्याचे सांगण्यात येत असले तरी विद्यार्थी सुविधांसाठी अर्थसंकल्पात काहीच तरतूद करायची नाही, हा कित्ता यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गिरविणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : विद्यार्थीकेंद्रित शिक्षण देत असल्याचे सांगण्यात येत असले तरी विद्यार्थी सुविधांसाठी अर्थसंकल्पात काहीच तरतूद करायची नाही, हा कित्ता यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गिरविणार आहे.
विद्यापीठाचा २०१८-१९ चा अर्थसंकल्प मंगळवारी अधिसभेत मांडला जाणार आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मंजूर केलेला ३२० कोटी ७ लाख रुपयांचा अर्थसंकल्प तब्बल ५५ कोटी ४७ लाख रुपये तुटीचा आहे. या अर्थसंकल्पात पुतळे, बांधकाम आदी गोष्टींनाच अधिक प्राधान्य दिले असून, विद्यार्थी सुविधांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते.
विद्यापीठाच्या ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीची माहिती मंगळवारी विद्यापीठ अधिसभेत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाली आहे. उत्पन्न आणि खर्चाचा मेळ कुठेही बसलेला नाही. यामुळे अर्थसंकल्पातील तुटीची मर्यादा तब्बल १७.३३ टक्क्यांवर पोहोचली आहे. यात विद्यापीठाला एकूण वेतनेतर उत्पन्न २०० कोटी ८८ लाख रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.
मात्र, याचवेळी वेतनेतर खर्चाची आवश्यकता तब्बल २५६ कोटी ३५ लाख रुपयांवर पोहोचली आहे. यामुळे हा संकल्प तब्बल ५५ कोटी ४७ लाख रुपये एवढा तुटीचा असेल. विद्यापीठ प्रशासनाला एकूण खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ घालताना दमछाक झाल्याचे या संकल्पावरून दिसते. यात विद्यार्थ्यांच्या पायाभूत सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अल्प तरतूद केली आहे. मात्र याच वेळी मेमोरियल, पुतळे उभारणी, सुशोभीकरण, बांधकाम आदी बाबींवर कोट्यवधींची तरतूद केली आहे.
विद्यार्थ्यांकडून मिळणार कोट्यवधी; खर्च होणार लाखात
अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कातून सर्वाधिक निधी जमा होणार आहे. हा निधी तब्बल ६३ कोटी ५२ लाख २५ हजार रुपये एवढा आहे. याशिवाय शिक्षण शुल्कापोटी ६ कोटी ६६ लाख, इतर शुल्कातून १९ कोटी ६१ लाख रुपये जमा होणार आहेत. मात्र विद्यार्थ्यांसाठीच्या परीक्षा खर्चांवर २३ कोटी १ लाख रुपये, विद्यार्थी विकास मंडळासाठी १ कोटी ६४ लाख, १७ वसतिगृहे व अतिथीगृहांसाठी ३८ लाख ४४ हजार रुपये (यात विद्यार्थी वसतिगृहांसाठी अल्प तरतूद), क्रीडा मंडळासाठी ६९ लाख २० हजार रुपये तरतूद केलेली आहे. याच वेळी विद्यापीठ कार्यालयासाठी १६ कोटी ७७ लाख २५ हजार, विद्यापीठ प्रशासकीय विभागासाठी २ कोटी २८ लाख ३० हजार, विविध मंडळांचे पदाधिकारी, अधिकारी यांच्या प्रवास व वाहन भत्त्यांसाठी १ कोटी ६ लाख रुपये तरतूद केली आहे.
पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना दिलासा
विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त २००८-०९ पासून विद्यापीठ फंडातून पीएच.डी.चे संशोधन करणाºया विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे पीएच.डी. संशोधन आर्थिक अडचणींमुळे थांबू नये, यासाठी नव्याने शेतकरी-शेतमजुरांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यासाठीही १ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात आहे. मात्र याच वेळी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाºया केंद्रीय युवक महोत्सव, युवक नेतृत्व शिबीर, विद्यार्थी संसद कार्यक्रम, विविध स्पर्धा, कार्यशाळा, विद्यार्थी सहाय्य निधी, इंद्रधनुष्य, आविष्कार, अश्वमेध, आव्हान आदी उपक्रमांसाठी केवळ १ कोटी दिले आहेत. तर कमवा व शिका योजनेसाठीही अल्प तरतूद केली आहे. ही तरतूद केवळ ६५ लाख रुपये आहे.