मोबाईल चोरट्यांची आंतरराज्य टोळी जाळयात
By Admin | Published: September 19, 2014 11:51 PM2014-09-19T23:51:03+5:302014-09-20T00:05:34+5:30
नवीन नांदेड : शहर आणि जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शहरात भरणाऱ्या आठवडी बाजारातून मोबाईल लंपास करणाऱ्या आंतर राज्य चोरट्यांच्या टोळीस नांदेड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले.
नवीन नांदेड : शहर आणि जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शहरात भरणाऱ्या आठवडी बाजारातून मोबाईल लंपास करणाऱ्या आंतर राज्य चोरट्यांच्या टोळीस नांदेड ग्रामीण पोलिसांनी १९ सप्टेंबर रोजी नांदेड शहरातून ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या झारखंड राज्यातील आठ चोरट्यांंच्या टोळीकडून पोलिसांनी जवळपास पावणेदोन लाख रूपये किंमतीचे वेग-वेगळया नामांकित कंपनीचे तब्बल १३ मोबाईल हस्तगत केले. एमआयडीसी भागातील दत्तात्रय गिरमाजी भालके हे १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सिडको परिसरातील गुरूवार आठवडी बाजारात भाजीपाला घेत होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी भालके यांची नजर चुकवून त्यांच्या शर्टाच्या खिशातील अंदाजे १९ हजार ६०० रूपये किंमतीचा ‘सोनी- एक्सपिरीया’ कंपनीचा मोबाईल लंपास केला़
अज्ञात चोरट्यांंनी बाजाराच्या गर्दीचा फायदा घेत मोबाईल लांबविल्याची बाब लक्षात येताच भालके यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. या घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलिस उपनिरीक्षक किशन राख व त्यांचे सहकारी हेकॉ. प्रकाश कुंभारे, ना. पो. कॉ. गंगाधर चिंतोरे, शेख ईब्राहिम, गंगाधर कदम, अनिल कुराडे, पद्मसिंह कांबळे, बंडू कलंदर व विलास मुस्तापुरे, पो. कॉ. बालाप्रसाद टरके व गोविंद येईलवाड यांनी शोध मोहिम राबविली.
विशेष शोध पथकाने ठाण्याच्या हद्दीमध्ये राबविलेल्या मोहिमेदरम्यान,मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा सूत्रधार ग्रामीण पोलिसांच्या जाळयात सापडला असून, त्याचे नाव मोहमद मुनाफअली शेख महेमूद ( वय- २५ वर्षे, रा. महाराजपूर, ता. तालाजरी, जि. साहेबगंज, राज्य - झारखंड ) असे असल्याची माहिती पोलिस आहे़ आंतरराज्य टोळीत अन्य सात आरोपींचा समावेश असून, यापैकी शेख लाडला शेख मखरोद्दीन उर्फ ‘मकवा’ हा २२ वर्षीय आहे. अन्य सहा आरोपींमध्ये ९ ते १३ वर्षीय बालकांचा समावेश आहे.
पोलिसांनी या टोळीकडून सॅमसंग कंपनीचे ५, ‘सोनी’चे ३, स्पाईसचा १, लाव्हाचा १, सेलकॉन १, मोटोरोलोचा १ व मायक्रोमॅक्सचा १ असे एकूण तब्बल १३ मोबाईल हस्तगत केले. (वार्ताहर)
दरम्यान, मोबाईल चोरट्यांच्या टोळीत ९ ते १३ वर्षीय बालकांचा समावेश आहे़ झारखंडमधून आणखी काही बालके शहरात याच उद्देशाने दाखल झाली असल्याचीही माहिती हाती आली आहे़ या टोळीचा पर्दाफाश झाल्यामुळे शहरातील मोबाईल चोरी प्रकरणाचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे़ या बालकांची मोबाईल चोरीची पद्धत पाहून पोलिसही अवाक झाले होते़