जि.प.मध्ये मद्यधुंद वकिलाचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:27 AM2017-12-22T00:27:28+5:302017-12-22T00:27:31+5:30
मद्याच्या नशेत तर्र असलेल्या एका वकिलाने गुरुवारी रात्री ७.३० ते ८ वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेत धुमाकूळ घातला. अधिकारी- पदाधिकाºयांच्या दालनात जाऊन अर्वाच्य शिवीगाळ करीत त्याने दिवे बंद केले. विशेष म्हणजे, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे यांच्या दालनात जाण्यापूर्वी त्याने सर्व दिवे बंद केले व तो दालनात गेला. अचानक दिवे बंद झाले व एक अज्ञात व्यक्ती दालनात शिरलेला बघून मंजूषा कापसे यांनी आरडाओरड करीत दालनाबाहेर धूम ठोकली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मद्याच्या नशेत तर्र असलेल्या एका वकिलाने गुरुवारी रात्री ७.३० ते ८ वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेत धुमाकूळ घातला. अधिकारी- पदाधिकाºयांच्या दालनात जाऊन अर्वाच्य शिवीगाळ करीत त्याने दिवे बंद केले. विशेष म्हणजे, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे यांच्या दालनात जाण्यापूर्वी त्याने सर्व दिवे बंद केले व तो दालनात गेला. अचानक दिवे बंद झाले व एक अज्ञात व्यक्ती दालनात शिरलेला बघून मंजूषा कापसे यांनी आरडाओरड करीत दालनाबाहेर धूम ठोकली.
झाले असे की, सायंकाळनंतर जिल्हा परिषदेत बºयापैकी नीरव शांतता असते. कर्मचारी निघून गेलेले असतात. काही पदाधिकारी व अधिकारी मात्र कार्यालयीन कामकाज करीत दालनात बसलेले असतात. आजही नेहमीसारखे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष हे दालनामध्ये फायलींचा निपटारा करण्यात व्यग्र होते. तेव्हा पारखे नावाचा एक वकील मद्यधुंद अवस्थेत जिल्हा परिषदेत आला. तो सर्वप्रथम उपाध्यक्ष केशव तायडे यांच्या दालनात गेला व जोरजोरात ओरडत दालन बंद करा, बाहेर निघा, दिवे बंद करा, ही कार्यालयीन कामकाज करण्याची वेळ आहे का, असे म्हणत गोंधळ घालत होता.
तेवढ्यात तेथील काही कर्मचाºयांनी त्याला हुसकावून लावले. तो पुढे कापसे यांच्या दालनाकडे गेला. तेथे त्याने गोंधळ घालत कार्यालयातील दिवे बंद केले व तो आत गेला. अचानक घडलेला हा प्रकार पाहून कापसे ओरडतच कार्यालयाबाहेर गेल्या. हा प्रकार पाहून आजूबाजूच्या कर्मचाºयांनी तिकडे धाव घेतली व त्याला धमकावत कार्यालयाबाहेर काढले. तेथून तो पुढे अध्यक्षांच्या कार्यालयाकडे गेला. तेथेही त्याने असाच प्रकार केला. त्यामुळे अधिकारी- पदाधिकारी व त्यांच्या कर्मचाºयांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे जाऊन सदरील मद्यधुंद वकिलाविरोधात पोलीस कारवाई करण्याची मागणी केली.
तक्रार देण्यास नकार
घडलेल्या प्रसंगाबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु तो होऊ शकला नाही. त्यानंतर यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा ते म्हणाले की, जिल्हा परिषदेत रात्रीच्या वेळी एका वकिलाने गोंधळ घातला. घडलेला प्रकार हा विचित्र होता. त्या वकिलाचा आणि जि.प.चा काडीचाही संबंध नाही, तरी त्याने अशा प्रकारे प्रदर्शन केले. त्याच्याविरुद्ध कापसे यांनी पोलिसांत तक्रार देण्यास नकार दिला आहे.