प्रेमीयुगुल रेल्वेरुळावर झोपले, मात्र रेल्वे येताच तरुणाने स्वत:ला वाचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 02:51 PM2019-04-26T14:51:49+5:302019-04-26T14:53:37+5:30
प्रेयसीचा गेला जीव, प्रियकर वाचला...
औरंगाबाद : आत्महत्या करण्यासाठी रेल्वेरुळावर झोपलेल्या अल्पवयीन प्रेमीयुगुलापैकी तरुणीच्या अंगावरून रेल्वे गेल्याने तिचा अंत झाला, तर रेल्वेला पाहून रुळावरून बाजूला उडी घेतलेला तरुण या घटनेत वाचला. ही घटना २५ एप्रिल रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली.
पंधरा वर्षीय मृत मुलीची ओळख पटू शकली नाही, तर तिचा प्रियकर जावेद खान (१७, रा. निजामाबाद, आंध्र प्रदेश) हा जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याविषयी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जावेद आणि सीमा हे प्रेमीयुगुल निजामाबाद येथील रहिवासी आहे. ते २४ एप्रिल रोजी निजामाबाद येथून पळून औरंगाबादेत आले. रात्री साडेसात वाजेच्या सुमारास ते शरणापूर शिवारातील रेल्वेरुळावर आत्महत्या करण्याच्या उद्देशाने गेले. रेल्वेरुळावर दोघेही हातात हात धरून झोपले.
मनमाडकडून औरंगाबादकडे रेल्वे भरधाव हॉर्न वाजत येऊ लागली. रेल्वे मोटारमनला रुळावर कोणीतरी झोपलेले असल्याचे दिसले. यामुळे त्यांनी गाडीला ब्रेक लावले; परंतु तोपर्यंत मुलीच्या डोक्यावरून रेल्वेचे चाक गेल्याने ती गतप्राण झाली. यावेळी जावेद याने रेल्वेचा हॉर्न आणि आवाजाने घाबरून रुळावरून बाजूला उडी घेतल्याने तो वाचला. या घटनेत तो किरकोळ जखमी झाला. यावेळी रेल्वे थांबवून रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. रेल्वे पोलिसांनी जखमी मुलाला घाटीत हलविले. ही घटना दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने दौलताबाद पोलिसांना घटनेची माहिती कळविण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत मुलीचे प्रेत घाटी रुग्णालयात हलविले. मृत मुलीची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत मुलगी ही आठवीमध्ये शिक्षण घेत होती, तर जावेद हा तिच्याच कॉलनीतील रहिवासी आहे. दोघेही परस्परांच्या प्रेमात आकंठ बुडाले आणि ते घरातून पळून आले. ही बाब घरी माहीत झाली तर आपल्याला जिवंत सोडणार नाहीत, या भीतीपोटी त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे जावेदने पोलिसांना सांगितले.