महापरिनिर्वाण दिन विशेष : औरंगाबादमधील नागसेनवनात बाबासाहेबांनी उभारलेल्या शैक्षणिक संकुलावर एक दृष्टीक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 12:50 AM2017-12-06T00:50:13+5:302017-12-06T14:00:32+5:30
दलितांच्या युवा पिढीला दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी डॉ. बाबासाहेबांनी नागसेनवनात त्यांच्या स्वप्नातील शैक्षणिक संकुल उभारले. केवळ शिक्षण नव्हे, तर नवा समाज घडविणे आणि आधुनिक भारताच्या उभारणीत या समाजाचा मोठा सहभाग असणे हा या मागचा उद्देश होता. प्रगल्भ राजकीय व नेतृत्व घडविणे हा त्यापैकीच एक उद्देश. यासाठी संस्थेचा आराखडाही तयार केला होता. ज्ञानार्जनासाठी त्यांनी भव्यदिव्य अशा ग्रंथालयाचे स्वप्न पाहिले होते. अशा त्यांच्या स्वप्नांची ६० वर्षांनंतर किती पूर्तता झाली ?
- राम शिनगारे
औरंगाबाद : नागसेनवनात बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या देखरेखीत निर्माण झालेली वास्तू म्हणजे मिलिंद मल्टिपर्पज स्कूलची इमारत. या इमारतीची रचनाही अनोखी आहे. उंचीवर वर्गखाल्या असून, विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत गाण्यासाठी, खेळासाठी, झेंडावंदन करण्यासाठी व्यवस्थित रचना बनविण्यात आलेली आहे.
हजारोंची संख्या आली शेकड्यात
इमारतीसाठी बनवलेले पिलर हेसुद्धा मिंलिद महाविद्यालय, वसतिगृहांच्या धर्तीवरच आहेत. सर्वांची रचना सारखीच आहे. या शाळेत मागील काही वर्षांपर्यंत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र, आता ही संख्या केवळ पाचशे ते सहाशेवर आलेली आहे, तर शिक्षकांची संख्याही आवघी २० एवढीच उरली असून, शिक्षकेतर कर्मचारी केवळ ५ आहेत. या इमारतीचे जतन करण्यासाठी दुरुस्तीची आवश्यकता आहे. यात समाधानाची बाब म्हणजे शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत इमारतीची डागडुजी करण्यास सुरुवात केली आहे. या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, काही महिन्यांत शाळेचे रूपडे पालटण्याची आशा आहे. आता त्या शाळेत विद्यार्थी संख्या वाढवून पुन्हा गतवैैभव प्राप्त करून देण्याचे आव्हान समाजातील हितचिंतकांसमोर आहे. या शाळेच्या मैदानावर सतत लग्नकार्य होत असतात. ही लग्नकार्य थांबली पाहिजेत, असे समाजातील अनेकांचे म्हणणे आहे. लग्नकार्याऐवजी प्रबोधन, शाळेतील उपक्रम या मैदानावर व्हावेत, अशी अपेक्षाही अनेक जण व्यक्त करतात.
अॅम्पी थिएटर बनले गाड्यांची पार्किंग
नवनवीन विचार आणि गोष्टींचा ध्यास असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाच्या भव्य अशा इमारतीसमोर खुल्या जागेत अॅम्पी थिएटरची निर्मिती केली होती. अॅम्पी थिएटर ही संकल्पना ग्रीक थिएटरवरून आलेली आहे. मिलिंद महाविद्यालयाच्या अगदी समोरच्या बाजूला गोल कठडा उभारून एका कोपºयात सर्वांना दिसेल अशा ठिकाणी मंच तयार केलेला आहे. हा मंच बाबासाहेबांनी तयार केला होता. ओपन थिएटर असेही त्याला म्हणता येईल. त्याठिकाणी मिलिंदचे तत्कालीन प्राचार्य एम. बी. चिटणीस यांनी ‘युगयात्रा’ नाटकाचे सादरीकरणही केले होते. या नाटकाला पाहण्यासाठी स्वत: बाबासाहेब उपस्थित होते. अशा या ऐतिहासिक अॅम्पी थिएटरची सध्या पार्किंग केलेली आहे. तेथे त्यासाठी एक शेडही उभारण्यात आले आहे. शेडच्या बाजूचा कठडाही माती टाकून बुजविण्याचे काम सुरू आहे.
मध्यवर्ती ग्रंथालयाची विद्यार्थ्यांना उत्सुकता
अद्वितीय बुद्धिमत्तेच्या आधारे घेतलेले अतिउच्च शिक्षण; जागतिक दर्जाची विद्वत्ता, बंडखोरी व क्रांतिकार्य करण्याची प्रवृत्ती, संघटन कौशल्य, शिस्तबद्धता व नीटनेटकेपणा, वक्तृत्व, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, प्रचंड वाचन, संशोधनात्मक अभ्यास, अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी लेखन... आदी गुणविशेषणांचा सागर म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
बाबासाहेबांचे संपूर्ण आयुष्य आपल्या दीनदुबळ्या समाजाच्या उत्थानासाठीच खर्च झाले. ते ज्ञानाचे भोक्ते होते. दिवसाचे १८-१८ तास ते वाचन करत. पुस्तक वाचण्याचे जणू व्यसनच होते त्यांना. जेथे कुठे जात तेथे हमखास ते पुस्तकाच्या दुकानाला भेट देत. ते जेव्हा शिक्षण पूर्ण करून अमेरिका येथून भारतात आले तेव्हा त्यांनी सोबत सुमारे २ हजार पुस्तके आणली होती. मुंबई येथील ‘राजगृह’ या स्वत:च्या घरात त्यांचे मोठे ग्रंथालय तयार केले होते. औरंगाबादेत मिलिंद महाविद्यालयाची उभारणी केल्यानंतर येथेही एक सुसज्ज मध्यवर्ती ग्रंथालय असावे, अशी त्यांची संकल्पना होती. त्यांच्या हयातीत ती पूर्ण झाली नाही; मात्र पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी मंडळाने मिलिंद कला महाविद्यालयासमोरील जागेसमोर या ग्रंथालयाची कोनशिला उभारली. कालोघात काही सदस्यांचे निधन झाले व ग्रंथालय इमारत उभारणीचा विषय मागे पडला.
पुन्हा १९९८ मध्ये नागसेनवन परिसरात विद्यापीठ गेटसमोर अजिंठा वसतिगृहाजवळील मोकळ्या जागेत संस्थेच्या वतीने या केंद्रीय ग्रंथालयाच्या इमारतीची कोनशिला उभारण्यात आली. आर्थिक विवंचनेमुळे हा प्रस्ताव पुन्हा मागे पडला. अलीकडच्या दोन- तीन वर्षांत पुन्हा केंद्रीय ग्रंथालयाच्या प्रस्तावाने उचल खाल्ली. विद्यमान राज्य शासनाकडे यासंबंधीचा प्रस्तावही सादर करण्यात आला. समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले यांनी पुढाकार घेत ग्रंथालय उभारणीसाठी २ कोटींचा निधीही मंजूर केला; परंतु हा निधी अतिशय कमी आहे. या निधीतून बाबासाहेबांच्या संकल्पनेतील मध्यवर्ती ग्रंथालय निर्माण होऊ शकत नाही, असा निरोप मिलिंद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान व अन्य सहका-यांनी शासनाला दिला.
नागसेनवन परिसरातील मध्यवर्ती ग्रंथालय कसे असेल, यासंबंधी डॉ. वैशाली प्रधान यांनी सांगितले की, सर्व सुविधांनी युक्त असे हे ग्रंथालय असेल. यात नागसेनवन परिसरातील महाविद्यालयांमध्ये शिकविल्या जाणाºया सर्व विद्याशाखांची तब्बल १० लाख पुस्तके असतील. संगणक, वायफाय परिसर असेल. २४ तास ग्रंथालय उघडे असेल. आयएएस, आयपीएस, एमपीएसी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास येथे करता येईल, यात एक म्युझियम असेल व त्यात बाबासाहेबांच्या वापरात आलेल्या वस्तू ठेवल्या जातील. दोन सेमिनार हॉल, एक आॅडोटोरियम असेल. परिपूर्ण सुसज्ज मध्यवर्ती ग्रंथालय साकारण्यासाठी ८० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यासंबंधीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. सादरीकरणाद्वारे ग्रंथालयाच्या रचनेची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे शासनाने दिलेले २ कोटी रुपये अद्याप संस्थेने स्वीकारलेले नाहीत.
शासनाच्या भरवशावर राहिले, तर या ग्रंथालयाच्या उभारणीला आणखी बराच कालावधी जाणार हे निश्चित. समाजात अनेक दानशूर व्यक्ती आहेत. उद्योजक आहेत. नागसेनवन परिसरातील महाविद्यालयांचे आजी-माजी विद्यार्थी जे देशाच्या विविध ठिकाणी उच्च पदांवर नोकरी करतात, त्यांच्याकडे यासंबंधीचा प्रस्ताव ठेवावा, राज्यसभेच्या खासदारांकडे यासंबंधीचा प्रस्ताव ठेवला, तर तेथील अनेक राज्यातील खासदार सढळ हाताने आपला स्वेच्छा निधी देऊ शकतील. औरंगाबादेत बाबासाहेबांच्या संक ल्पनेतील ग्रंथालय उभारण्यासाठी पीईएसच्या वतीने आर्थिक मदतीचे आवाहन केल्यास अनेकजण पुढे येऊ शकतात. याचा विचार व्हावा. ‘मिलिंद’च्या माध्यमातून बाबासाहेबांचे औरंगाबाद शहरावर खूप प्रेम होते. त्यामुळे त्यांच्या संकल्पनेतील मध्यवर्ती ग्रंथालयाची मुहूर्तमेढ लवकरात लवकर येथे रोवल्यास ख-या अर्थाने बाबासाहेबांना हीच खरी आदरांजली ठरेल !