Maratha Reservation : मराठा क्रांती मोर्चाची उद्या ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; अहिंसक मार्गाने होणार आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 05:16 PM2018-08-08T17:16:59+5:302018-08-08T17:27:17+5:30
९ आॅगस्ट, क्रांती दिनी मराठा आरक्षणासाठी सूर्यादयापासून ते सूर्यास्तापर्यंत ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे.
औरंगाबाद : ९ आॅगस्ट, क्रांती दिनी मराठा आरक्षणासाठी सूर्यादयापासून ते सूर्यास्तापर्यंत ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे. हा बंद शांतता, अहिंसेच्या मार्गाने करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला.
मराठा क्रांती मोर्चाची सुरूवात दोन वर्षांपूर्वी ९ आॅगस्ट या क्रांती दिनी झाली होती. मराठा समाजाने दोन वर्षांपूर्वी ५८ मोर्चे शांततेत काढले तरीही सरकार दखल घेत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर गुरूवारी (दि.९) क्रांती दिनी महाराष्ट्र बंद ठेवण्याची घोषणा केली होती. मात्र दोन दिवसांपासून बंद विषयी संभ्रम निर्माण केला होता. यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी औरंगाबादेतील विंडसर कॅसेल हॉटेलमध्ये गुरुवारी (दि८) राज्यस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत ३२ जिल्ह्यातील समन्वयकांनी तिव्र भावना मांडल्या.
मुंबई, ठाणे पसिरातील समन्वयकांशीही भ्रमणध्वनीवर संवाद साधला. यानंतर नियोजित ‘महाराष्ट्र बंद’चा निर्णय कायम ठेवण्यात आला. या बंदमध्ये कोणत्याही प्रकारची हिंसा केली जाणार नाही. अहिंसेच्या मार्गाने बंद पुकारण्यात येत आहे. वैद्यकीय, वाहतुक, अॅम्ब्यूलन्स, शाळेची बस अशा अत्यावश्यक सेवा बंद करण्यात येणार नाही. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होईल, अशा पद्धतीचे वर्तन मराठा क्रांती मोर्चाकडून होणार नसल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी आमच्या न्याय मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाला सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी समन्वयकांनी केले. यावेळी चंद्रकांत भराट, विनोद पाटील, अंबादास दानवे, राजेंद्र जंजाळ, अभिजित देशमुख, रविंद्र काळे, प्रा. शिवानंद भानुसे आदींसह राज्यातुन प्रत्येक जिल्हा, तालुक्याचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.
धार्मिक कार्यक्रमांना रोखू नका
महाराष्ट्र बंद दरम्यान कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाला जाणाºयांना रोखण्यात येऊ नये, मुस्लिम बांधव हज यात्रेला जात आहेत. त्यांचा रास्ता आडवू नये, उलट रास्ता मोकळा करून द्यावा, सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था असलेल्या एसटी महामंडळाच्या गाड्या आडवून नये, शाळेच्या बस, अॅम्ब्यूलन्सला रास्ता आडवू नये, तोडफोड, जाळपोळ करू नये, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
१५ आॅगस्टला चुल बंद आंदोलन
मराठा आरक्षणासाठी प्रत्येक जिल्हा, तालुकास्तरावर ठिय्या आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही. तसेच ९ आॅगस्टला महाराष्ट्र बंद, १० आॅगस्टनंतर साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे. मराठा समाज आंदोलनात जाळपोळ, हिंसा करतो असा आरोप राज्यकर्त्यांनी लावला असल्यामुळे स्वातंत्र्यदिनी १५ आॅगस्टला स्वत:लाच आत्मक्लेश करून घेण्यासाठी चुलबंद आंदोलन केले जाणार असल्याचेही समन्वयकांनी स्पष्ट केले.
या आहेत मागण्या
- मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे.
- शब्दछल न करता दाखल गुन्हे १० आॅगस्टपर्यंत सरसकट मागे घ्यावेत.
- जाहीर केलेल्या योजनांची तात्काळ अंमलबजावणी करावी.
- आत्महत्या केलेल्या युवकांच्या कुटुंबियांना ५० लाख रूपयांची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्यावी