गोंधळी नगरसेवकांचा अहवाल शासनाला देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 01:00 AM2017-10-18T01:00:03+5:302017-10-18T01:00:03+5:30

गोंधळी नगरसेवकांचा अहवाल लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिली.

MIM corporators report will be send to the government by AMC | गोंधळी नगरसेवकांचा अहवाल शासनाला देणार

गोंधळी नगरसेवकांचा अहवाल शासनाला देणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी एमआयएमच्या दोन नगरसेवकांनी अभूतपूर्व असा गोंधळ घालत चक्क महापौरांच्या अंगावर प्लास्टिकच्या खुर्च्या भिरकावल्या होत्या. या घटनेची मनपा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली असून, गोंधळी नगरसेवकांचा अहवाल लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिली. शासनाने हिरवा कंदिल दाखविल्यानंतर नोटीस देऊन गोंधळी नगरसेवकांचे पदही रद्द करण्यात येऊ शकते.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी पाणी प्रश्नावर चर्चा सुरू असताना अपक्ष तथा एमआयएम समर्थक नगरसेवक अजीम अहेमद यांनी सर्वप्रथम सुरक्षा रक्षक जाधव यांना ढकलून दिले. त्यानंतर सय्यद मतीन, शेख जफर सुरक्षा रक्षकाच्या अंगावर धावून जात होते. महापौरांनी मतीन आणि जफर यांचे सभागृहातील सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द केले. त्यामुळे दोन्ही नगरसेवकांनी महापौरांच्या अंगावर प्लास्टिकच्या खुर्च्या भिरकावल्या होत्या. याप्रकरणी महापौरांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचा अहवाल शासनाला पाठवावा, असे नमूद केले आहे. महापौरांच्या आदेशानुसार लवकरच शासनाकडे अहवाल पाठविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. शासनाने हिरवा कंदिल दाखविल्यास गोंधळी नगरसेवकांना नोटीस देऊन पद रद्द करण्याची दाट शक्यता असल्याचे सूत्रांनी नमूद केले. यापूर्वी वंदेमातरम्च्या मुद्यावरून या दोघांनी सभागृहात गोंधळ केला होता. या प्रवृत्तीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

Web Title: MIM corporators report will be send to the government by AMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.