नाट्यमहोत्सव हाऊसफुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2017 12:04 AM2017-04-18T00:04:30+5:302017-04-18T00:06:43+5:30
उस्मानाबाद : २१ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद येथील श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलावर रविवारपासून नाट्यमहोत्सवाला प्रारंभ झाला आहे.
उस्मानाबाद : २१ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद येथील श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलावर रविवारपासून नाट्यमहोत्सवाला प्रारंभ झाला आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारीही रसिकांच्या प्रचंड उपस्थितीने नाट्यमहोत्सव स्थळ तुडूंब भरले होते. विशेष म्हणजे महिलांची उपस्थितीही या कार्यक्रमांना लक्षवेधी लाभत आहे.
२१ एप्रिलपासून येथील जिल्हा क्रीडा संकुलावर अखिल भारतीय नाट्यसंमेलन रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर १६ एप्रिलपासून पाच दिवसीय नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. १६ एप्रिल रोजी महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यालाच रसिकांनी अभूतपूर्व उपस्थिती लावली होती. उद्घाटन सोहळ्यानंतर रंगमंचावर सादर झालेल्या ‘आॅल दी बेस्ट’ या नाट्यकृतीने उपस्थितांची मने जिंकली. ‘आॅल दी बेस्ट’ मध्ये असलेल्या नव्या दमाच्या युवा कलाकारांनी मोठ्या ताकदीने हा विनोदी प्रयोग पार पाडला. महोत्सवाचा दुसरा दिवसही असाच प्रचंड प्रतिसादाचा ठरला. यदा कदाचित या नाट्यकृतीलाही रसिकांनी भरभरुन दाद दिली. त्यानंतर रात्री उशिरा सुरेखा पुणेकर प्रस्तुत नटरंगी नार हा लावण्यांचा धडाकेबाज कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमावेळी जिल्हा क्रीडा संकुलावरील मुख्य रंगमंच फुलून गेला होता. यामध्ये महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. नाट्यमहोत्सवाच्या संयोजन समितीने केलेल्या चोख नियोजनाचेही नाट्यरसिकांतून कौतुक होत आहे.