मराठवाडा सांस्कृतिक मंडळाला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 12:19 AM2018-06-30T00:19:03+5:302018-06-30T00:20:58+5:30
जिल्हा परिषदेच्या मालमत्तांवर झालेल्या अतिक्रमणांबाबत आज शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. ज्या उद्देशासाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाला जिल्हा परिषदेने ९९ वर्षांच्या लीजवर जागा दिलेली आहे, त्या उद्देशासाठी ती वापरली जात नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या मालमत्तांवर झालेल्या अतिक्रमणांबाबत आज शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. ज्या उद्देशासाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाला जिल्हा परिषदेने ९९ वर्षांच्या लीजवर जागा दिलेली आहे, त्या उद्देशासाठी ती वापरली जात नाही. या जागेसाठी झालेला भाडेतत्त्वाचा करार रद्द करण्यासंबंधी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाला नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला.
जि. प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे, उपाध्यक्ष केशव तायडे, बैठकीचे सदस्य सचिव तथा सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, सभापती विलास भुमरे, मीना शेळके, कुसुम लोहकरे, सदस्य अविनाश पाटील गलांडे, किशोर बलांडे, रमेश गायकवाड, मधुकर वालतुरे, रमेश बोरनारे, किशोर पवार, राजू जैस्वाल आदी उपस्थित होते.
किशोर बलांडे यांनी प्रश्न उपस्थित केला की, जिल्ह्यात जि. प. च्या किती जागांवर अतिक्रमण झाले आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे माहिती आहे का. मागील बैठकीत या विषयावर चर्चा झाली होती. यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या समितीने आतापर्यंत कोणती कार्यवाही केली? तेव्हा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांनी सभागृहात सांगितले की, जिल्हा परिषदेच्या मालकीच्या मालमत्तांच्या संरक्षणासाठी शासनाने पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांना नोडल आॅफिसर म्हणून नेमले आहे. यासंदर्भात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली अधिकाºयांची समिती स्थापन केली असून, या महिन्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्या उपस्थितीत आतापर्यंत दोन बैठका घेण्यात आल्या. आतापर्यंत १७ मालमत्तांची माहिती प्राप्त झाली. आरोग्य आणि अन्य विभागांच्या मालमत्तांची माहिती प्राप्त झालेली नाही. विभागप्रमुखांकडे मालमत्तांचा ७/१२ चा उतारा व नोंदणी प्रमाणपत्रांची मागणी केली आहे. किती जागांवर अतिक्रमण झाले आहे, यासंबंधीही सविस्तर माहिती मागितली आहे. जिल्हाभरातील जि. प. मालमत्तांची रीतसर मोजणी करून घेणे गरजेचे आहे, असे सांगून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरसे म्हणाले की, सर्व कायदेशीर प्रक्रिया करूनच अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घ्यावी लागेल. रमेश गायकवाड, अविनाश गलांडे, किशोर बलांडे यांनी औरंगाबाद शहरातील दिल्लीगेटलगतच्या जिल्हा परिषदेच्या जागेवर अतिक्रमण करून पेट्रोलपंप उभारण्यात आला आहे.
पैठण रोडलगत जि.प.ची ३२ एकर जागा आहे. त्या जागेवर कृषी विद्यापीठाने अतिक्रमण केले आहे. औरंगाबाद पंचायत समितीच्या जागेवर एका व्यक्तीने अतिक्रमण केले आहे. याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोपही केला. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाला वर्षाला अवघा १ रुपया आकारून ९९ वर्षांच्या लीजवर जिल्हा परिषदेने जागा दिली आहे. मात्र, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाने ज्या उद्देशाने ती जागा घेतली होती, तो उद्देश साध्य झालेला नाही. त्यामुळे मराठवाडा सांस्कृतिक मंडळासोबतचा भाडेकरार रद्द करण्यापूर्वी नोटीस बजावण्याचा निर्णय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांनी सभागृहात घेतला.
...अन् अध्यक्षा डोणगावकर संतापल्या
अतिक्रमणाच्या मुद्यावर पदाधिकारी गप्प असल्यामुळे शंका यायला लागली आहे, असा आरोप मधुकर वालतुरे यांनी करताच संतप्त अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांंनी माईक हातात घेऊन प्रतिप्रश्न केला. त्या म्हणाल्या अलीकडच्या दीड वर्षात जि.प.च्या जागांवर अतिक्रमणे झालेली आहेत का. कोणत्याही प्रश्नांवर राजकारण करू नका. तुम्ही हा प्रश्न केलाच कसा.
तेवढ्यात रमेश गायकवाड यांनी महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू आहे. या प्रश्नावर राजकारण करून विषयाला बगल देऊ नका, अशी कोपरखळी वालतुरे यांना मारली. दरम्यान, औरंगाबाद पंचायत समितीच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यापूर्वी रीतसर नोटीस बजावण्यात यावी. त्यानंतर रीतसर पोलीस बंदोबस्त घेऊन ते अतिक्रमण पाडण्याच्या सूचना गटविकास अधिकारी राठोड यांना दिल्या.