औरंगाबाद जिल्हा परिषदेतील कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा; विनापरवाना द्वारसभा भोवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 07:11 PM2018-04-05T19:11:14+5:302018-04-05T19:13:08+5:30
: जिल्हा परिषदेच्या उद्यानामध्ये विनापरवाना कर्मचाऱ्यांना जमवून प्रशासनाच्या विरोधात भडकावू भाषण केल्याप्रकरणी कर्मचारी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना कारणेदर्शक नोटिसा काढण्यात आल्या आहेत.
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या उद्यानामध्ये विनापरवाना कर्मचाऱ्यांना जमवून प्रशासनाच्या विरोधात भडकावू भाषण केल्याप्रकरणी कर्मचारी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना कारणेदर्शक नोटिसा काढण्यात आल्या आहेत.
कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी प्रशासनाने जिल्हा परिषदेतील बांधकाम, आरोग्य आणि शिक्षणविभागातील पाच कर्मचाऱ्यांना दोन दिवसांपूर्वी निलंबित केले होते. या घटनेमुळे जि. प. मुख्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. सोमवारी जि. प. कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन उद्यानात बैठक आयोजित केली. या बैठकीत प्रदीप राठोड, संजय महाळंकर व अन्य काही पदाधिकाऱ्यांनी भाषणे केली.
कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट निलंबन करणे चुकीचे आहे. निलंबित करण्याएवढा मोठा गंभीर गुन्हाही कर्मचाऱ्यांच्या हातून घडलेला नाही. ज्या काही चुका झालेल्या असतील तर त्या कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करणे अथवा वेतनवाढी रोखण्याची शिक्षा करता आली असती. मात्र थेट निलंबित करण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचले आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.
तथापि, काल मंगळवारी पुन्हा सदरील कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यात यावे, या आशयाच्या निवेदनावर पदाधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ते सादर केले. निलंबन मागे घेण्यासाठी प्रशासनाला दोन दिवसांचा अवधी देण्यात आला असून, जर प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिले तर ६ एप्रिलपासून सर्व कर्मचारी बेमुदत लेखणीबंद आंदोलन करतील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता. कर्मचारी संघटनांनी चुकीचे पाऊल उचलले ते प्रशासनाला इशारा देऊ शकत नाहीत. कार्यालयीन वेळेत विनापरवाना कर्मचाऱ्यांना जमवून त्यांच्यासमोर प्रशासनाविरोधी भाषण करणे हे कार्यालयीन शिस्तीच्या विरोधी आहे. त्यासंदर्भात कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटून सांगू शकले असते, पण तसे झाले नाही. उद्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे यांनी सांगितले.
संजय महाळंकरांचा ‘यू टर्न’
जि. प. कर्मचारी युनियनचे सचिव प्रदीप राठोड म्हणाले की, सोमवारी उद्यानात घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये संजय महाळंकर यांनी भडका करणारे भाषण केले. ‘सीईओ’ना हटविण्याची ताकद कर्मचाऱ्यांमध्ये असून, आम्ही नाशिक येथील ‘सीईओ’ची बदली केली होती; आपण एकजुटीची ताकद येथे दाखवू शकतो, असे ते म्हणाले. दुसऱ्या दिवशी मात्र सीईओ यांना देण्यात येणाऱ्या निवेदनावर स्वाक्षरी करण्यास त्यांनी नकार दिला. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची ही भूमिका योग्य नाही. आम्ही उद्या गुरुवारी सीईओ यांची भेट घेणार आहोत, असे राठोड यांनी सांगितले.
बंदमध्ये महासंघ सहभागी नाही
६ एप्रिलपासून आयोजित कामबंद आंदोलनात जि. प. कर्मचारी महासंघ तसेच संलग्न सर्व प्रवर्ग संघटना सहभागी होणार नाहीत, असे बी. टी. साळवे, संजय महाळंकर यांनी कळविले आहे.