...आता कुलसचिव शोधावे लागणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:39 AM2017-11-10T00:39:46+5:302017-11-10T00:39:57+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यमान कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी १४ नोव्हेंबर रोजी पूर्ण होत आहे. राज्य सरकारकडून हा कालावधी वाढवून मिळण्याची शक्यता नसल्यामुळे डॉ. जब्दे हे शुक्रवारीच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातील मूळ पदावर रुजू होणार असल्याचे समजते.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यमान कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी १४ नोव्हेंबर रोजी पूर्ण होत आहे. राज्य सरकारकडून हा कालावधी वाढवून मिळण्याची शक्यता नसल्यामुळे डॉ. जब्दे हे शुक्रवारीच मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातील मूळ पदावर रुजू होणार असल्याचे समजते. यामुळे परीक्षा संचालकाप्रमाणे कुलगुरूंना प्रभारी कुलसचिवपदासाठी व्यक्ती शोधावी लागणार आहे.
विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच कुलगुरूंनी प्रचलित नियमांनुसार कुलसचिवांची नेमणूक न करता डॉ. प्रदीप जब्दे यांना विद्यापीठ फंडातून वेतन दिले आहे. या दिलेल्या वेतनाविषयी राज्य सरकारने कडक शब्दांत ताशेरेही ओढले आहेत. याचवेळी डॉ. जब्दे यांची म.शि.प्र. मंडळाच्या गंगापूर येथील महाविद्यालयाच्या प्राचार्यपदावरून विद्यापीठाच्या कुलसचिवपदावर सहा महिन्यांसाठी प्रतिनियुक्ती केली होती. ही मुदत १४ नोव्हेंबर रोजी संपत आहे. मात्र, शनिवार, रविवारी सुट्या आल्यामुळे कुलसचिवांनी शुक्रवारीच मंडळात रुजू होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विद्यापीठाच्या निवडणूक विभागात काम करणाºया कर्मचा-यांना डॉ. जब्दे यांनी तशा पद्धतीच्या सूचनाही दिल्याचे समजते. पेंडिंग असलेली कामे पूर्ण करून घ्या, शुक्रवारी मी असेनच असे नाही. या शब्दांत सर्व कामे उरकून घेण्यास सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. याविषयी मंडळात चौकशी केली असता, डॉ. जब्दे हे रुजू होणार असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर सांगण्यात आले. मात्र, ते शुक्रवारी रुजू होणार, की सोमवारी याविषयी मतभिन्नता असल्याचे समजते. मात्र, राज्य सरकारने दिलेल्या मुदतीच्या आतच मूळ पदावर रुजू होण्यास डॉ. जब्दे यांनी प्राधान्य दिले आहे.
प्रतिनियुक्ती देण्यापूर्वी सेवासातत्य खंडित झाले आहे. याविषयीचे ताशेरे सरकारने ओढले असल्यामुळे पुन्हा तीच चूक होऊ नये, याची खबरदारी डॉ. जब्दे घेत असल्याचे समजते.