अधिकारी आले सामान्य बोगीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:14 AM2017-11-07T00:14:50+5:302017-11-07T00:14:52+5:30
‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून समोर आणताच खडबडून जागे झालेल्या वरिष्ठ अधिका-यांनी ‘व्हीआयपी’ संस्कृतीला दूर करून अखेर सामान्य बोगीतून प्रवास करणे सुरू केले आहे
संतोष हिरेमठ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : रेल्वेमंत्र्यांच्या सूचनेनंतरही दौ-याच्या नावाखाली दक्षिण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांचा ‘व्हीआयपी’ थाट सुरूच होता. हा प्रकार ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून समोर आणताच खडबडून जागे झालेल्या वरिष्ठ अधिका-यांनी ‘व्हीआयपी’ संस्कृतीला दूर करून अखेर सामान्य बोगीतून प्रवास करणे सुरू केले आहे. वरिष्ठ अधिका-यांना सामान्य बोगीत पाहून रेल्वे प्रवासीदेखील थक्क होऊन जात आहेत.
दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी शनिवारी काचीगुडा ते जेडचेर्लापर्यंत काचीगुडा-चेन्नई एग्मोर एक्स्प्रेसमधून प्रवास केला. यावेळी त्यांनी स्लीपर क्लास बोगीतून प्रवास करून प्रवाशांबरोबर संवाद साधून रेल्वेच्या सुविधांविषयी विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी कर्नुल सिटी-काचीगुडा तुंगभद्रा एक्स्प्रेसमधून परतीचा प्रवास केला. या रेल्वेतही त्यांनी सामान्य बोगीतून प्रवास करून प्रवाशांबरोबर संवाद साधला.
रेल्वे अधिकारी जेव्हा प्रवास करतात तेव्हा त्यांचा राजेशाही थाट दिसतो. त्यांच्यासाठी रेल्वेला विविध सोयी-सुविधांनी सुसज्ज असे सलून अथवा ‘एक्झिक्युटिव्ह क्लास’ची बोगी जोडली जाते. परंतु अधिकाºयांनी ही शानशोकी बंद करावी आणि रेल्वेच्या नियमित स्लीपर व थ्री-टियर बोगीतून प्रवास करून प्रवाशांमध्ये मिसळावे, अशी सूचना रेल्वेमंत्र्यांनी आॅक्टोबरच्या प्रारंभी केली.
परंतु रेल्वेमंत्र्यांच्या सूचनेनंतरही रेल्वे अधिकाºयांचा ‘व्हीआयपी’ थाट काही केल्या जात नव्हता. दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिका-यांच्या दौ-यात व्हीआयपी संस्कृतीचे दर्शन प्रवाशांना घडतच होते.
विशेष म्हणजे अधिका-यांनी प्रवाशांमध्ये मिसळावे, असे आदेश असताना सोयी-सुविधांनी सज्ज अशा निरीक्षण बोगीतून प्रवास केला गेला. हा प्रकार ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून समोर आणला.
विनोदकुमार यादव यांनी पहिल्याच वार्षिक निरीक्षणाचे निमित्त साधून २८ जानेवारीला विशेष बोगीने औरंगाबादला आल्यानंतर शिर्डी आणि शनि शिंगणापूरला जाऊन देवदर्शन केले होते. हा प्रकारही ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता.
अखेर ‘दमरे’च्या महाव्यवस्थापकांनी सामान्य बोगीतून प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून इतर अधिका-यांनाही सामान्य बोगीतून प्रवास करावा लागणार आहे.