औरंगाबादेत दुस-या दिवशीही पालेभाज्या कवडीमोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 11:56 PM2018-02-08T23:56:08+5:302018-02-08T23:56:17+5:30
जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारात दुस-या दिवशीही फळ-पालेभाज्या कवडीमोल भावात विक्री झाल्या. फुलकोबी, पत्ताकोबी, टोमॅटोपाठोपाठ वांग्याचे भावही आज गडगडले होते. पालेभाज्याही मोठ्या प्रमाणात विक्रीविना शिल्लक राहिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारात दुस-या दिवशीही फळ-पालेभाज्या कवडीमोल भावात विक्री झाल्या. फुलकोबी, पत्ताकोबी, टोमॅटोपाठोपाठ वांग्याचे भावही आज गडगडले होते. पालेभाज्याही मोठ्या प्रमाणात विक्रीविना शिल्लक राहिल्या.
शुक्रवारी फळभाजीपाला अडत बाजाराला साप्ताहिक सुटी असते, यामुळे आज गुरुवारी मोठ्या प्रमाणात फळपालेभाज्यांची आवक झाली होती. बुधवारप्रमाणेच आज पत्ताकोबी व फुलकोबी २ ते ४ रुपये किलोने विक्री झाल्या. आज वांग्याचेही भाव गडगडले. ३ रुपये किलोने वांगे विकल्या जात होते. बुलढाणा जिल्ह्यातून ८ टन डांगर विक्रीला आले होते. ते १० रुपये किलोने विकले जात होते. एरव्ही १५ रुपये किलोने विक्री होणारे गावरान गाजर ८ रुपये किलोने विक्री झाले. अडीच ते तीन रुपये किलो भावाचे टोमॅटो खरेदी करण्यास ग्राहक मिळत नव्हते. भालगाव येथील शेतकरी दौलतराव डिगुळे यांनी सांगितले की, आज २७ पोती फुुलकोबी विक्रीला आणली होती. ३५ किलोचे पोते २०० रुपयांत विक ले जाईल असे वाटले होते; पण ७० रुपये भाव मिळाला. जिथे ५,६०० रुपयांची अपेक्षा केली होती तिथे हातात १८९० रुपये आले. बाजारात फुलकोबीची आवक वाढल्याने भाव घसरले. अनिल लोखंडे या अडत्याने सांगितले की, सुमारे ४० टन गाजराची आवक बाजारात झाली यामुळे गावरान गाजरालाही खरेदीदार मिळत नव्हता. आज शेकडो जनावरांनी हैदोस घातला. म्हशी,गायी, बकºया पोत्यातून, रिक्षातून फुलकोबी ओढून खात होते.
रताळी आठ रूपये किलो
शिवरात्र जवळ येत असून, अडत बाजारात रताळ्यांची आवक वाढू लागली आहे. यंदा रताळ्यांच्या उत्पादनात दुपटीने वाढ झाल्याने भाव घसरले आहे. अडत बाजारात ५ गाडी रताळे आले होते. ते ८ ते १० रुपये किलोने विक्री झाले. कलीम पठाण या विक्रेत्याने सांगितले की, मागील वर्षी ३० रुपये किलोने रताळे विकले होते. शिवरात्रीपर्यंत आणखी आवक वाढणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.