दोन दशकांपासूनच्या बेवारस वाहनांचा लिलाव करण्याचे पोलीस आयुक्तांनी बजावले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 07:06 PM2017-12-07T19:06:24+5:302017-12-07T19:07:09+5:30
वाळूज महानगर (औरंगाबाद ) : औरंगाबाद शहरातील विविध पोलीस ठाणे व वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गत दोन दशकांपासून लाखो ...
वाळूज महानगर (औरंगाबाद ) : औरंगाबाद शहरातील विविध पोलीस ठाणे व वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गत दोन दशकांपासून लाखो रुपये किमतीची शेकडो बेवारस वाहने धूळखात पडून असल्याचे वृत्त नुकतेच लोकमतने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन पोलीस आयुक्तांनी या बेवारस वाहनांचे लिलाव करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त व संबंधित ठाणेप्रमुखांना बजावले आहे. त्यामुळे या बेवारस वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया पोलीस विभागाकडून सुरु करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणा-या वाळूज, एमआयडीसी वाळूज व शहरातील पोलीस ठाण्यात लाखो रुपये किमतीची हजारो बेवारस वाहने भंगारात धूळखात पडून आहेत. विविध गुन्हे, चोरी व अपघातग्रस्त दुचाकी व चारचाकी आदी वाहने पोलीस ठाण्यात अनेक वर्षांपासून पडलेल्या आहेत. विशेष म्हणजे या वाहनांना ठेवण्यासाठी बहुतांश पोलीस ठाण्यात जागाच नाही. स्थानिक ठाणेप्रमुखांनी ही वाहने मिळले त्या ठिकाणी उभ्या करुन ठेवली आहेत.
वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी पडलेली हजारो वाहने ऊन व पावसात धूळखात पडलेली आहेत. या भंगार बेवारस वाहनांविषयी लोकमतने २७ नोव्हेंबरच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी त्याच दिवशी पोलीस उपायुक्तांना भंगार वाहनाचे लिलाव करण्याचे आदेश बजावले होते. पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या आदेशाने पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी जवाहरनगर ठाण्यातील भंगार वाहनांचा लिलाव करण्याची प्रकिया सुरु केली. टप्प्याटप्प्याने प्रत्येक ठाण्यातील भंगार वाहनांचा लिलाव होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
वाहनमालकांनी संपर्क साधावा
एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गत अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहने पडून आहेत. चोरी झालेली तसेच अपघातग्रस्त वाहने पोलीस ठाण्यात असून मूळ मालकांनी वाहनाची कागदपत्रे सादर केल्यास त्यांना वाहनांचा ताबा देण्यात येईल. इतर बेवारस वाहनांसंर्दभात आरटीओ व वरिष्ठ पोलिस अधिका-यांशी पत्र व्यवहार करण्यात आला असून लवकरच या वाहनाचा लिलाव करण्यात येणार असल्याचे एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.