दहा हजारांची लाच घेताना पोलीस हवालदार चतुर्भुज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:51 AM2017-09-02T00:51:26+5:302017-09-02T00:51:26+5:30
अटक टाळण्यासाठी अंबड येथील एका आरोपीकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना आलमगाव बीटचा पोलीस हवालदार सय्यद आरेफोद्दीन शरिफोद्दीन यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अटक टाळण्यासाठी अंबड येथील एका आरोपीकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना आलमगाव बीटचा पोलीस हवालदार सय्यद आरेफोद्दीन शरिफोद्दीन यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले.
अंबड येथील शेख गफूर शेख बीबन यांच्या शेख अजीम नामक मुलाने २०१४ मध्ये आत्महत्या केली होती. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये शेख गफूर यांच्याविरुध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणात अटक टाळण्यासाठी शेख गफूर यांना पोलीस हवालदार सय्यद आरेफोद्दीन यांनी ४० हजारांची मागणी केली होती. तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले.
लाच देण्याची इच्छा नसल्याने शेख गफूर याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गुरुवारी तक्रार केली. त्याच दिवशी अंबड येथे लाचलुचपत विभागाच्या पथकाने खातरजमा केली असता आरोपीने लाचेची मागणी केल्याचे व तो ती स्वीकारणार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शुक्रवारी पथकाने सापळा लावून नगर परिषद रोडवर असलेल्या एका दुकानासमोर तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना हवालदार सय्यद आरेफोद्दीन शरीफोद्दीन यास रंगेहाथ पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर पोलिस अधीक्षक एस. आर. गिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलिस निरीक्षक व्ही. एल. चव्हाण, कर्मचारी अशोक टेहरे, संतोष धायडे, प्रदीप दौंडे, संजय उदगीरकर, अमोल आगलावे, नंदू शेंडीवाले, रामचंद्र कुदर, म्हस्के, गंभीर पाटील, संदीप लव्हारे, महेंद्र सोनवणे, खंदारे यांच्या पथकाने ही कार्यवाही पार पाडली.