औरंगाबाद ग्रामीणची बायोमेट्रीक पद्धतीने प्रथमच पोलीस भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 08:17 PM2018-03-12T20:17:53+5:302018-03-12T20:18:32+5:30
ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने रिक्त ९६ पदासाठी आज सोमवारपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरवात झाली.
औरंगाबाद : ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने रिक्त ९६ पदासाठी आज सोमवारपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरवात झाली. पोलीस भरतीत डमी उमेदवार बसविण्यास वाव असू नये, यासाठी या भरतीत बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. संपूर्ण भरती प्रक्रियेवर ईन कॅमेरा होत असून २१ व्हिडिओग्राफर प्रत्येक क्षण टिपत आहे.
पोलीस अधीक्षक डॉॅ. आरती सिंह यांनी या भरती प्रक्रियेविषयी माहिती देताना सांगितले की, औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाच्या अस्थापनेसाठी पोलीस शिपायांची २० तर कारागृह पोलीस शिपायांच्या ७६ अशा एकूण ९६पदासाठी आजपासून भरती प्रक्रिया सुरू झाली. आज पहिल्या दिवशी ८०० उमेदवारांना बोलविण्यात आले होते. त्यापैकी ४६९ उमेदवारांनी सकाळी साडेपाच वाजता भरतीसाठी हजेरी लावली. उपस्थित उमेदवारांपैकी ३९४ जण मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले.
पोलीस भरती अत्यंत पारदर्शकता ठेवण्यात आल्याचे डॉ.सिंह यांनी सांगितले. ते म्हणाले की, उमेदवारांना मैदानी चाचणी देताना त्यांना मिळणाºया गुणांमध्ये अचुकता असावी आणि डमी उमेदवारांना थारा मिळू नये,यासाठी प्रथमच भरतीसाठी येणाºया उमेदवारांची पडताळणी बायोमेट्रीक पद्धतीने करण्यात येत आहे. आर.एफ.आय.डी. पद्धतीद्वारे उमेदवारांचा धावण्याचा अचूक वेळ नोंदवून उमेदवारांना अचूक गुण दिले जाणार आहे. आधुनिक यंत्राचा वापर करून संपूर्ण पोलीस भरती ईन कॅमेरा होत आहे. याकरीता मैदानावर सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले असून भरती प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रण केले जात आहे. या भरतीदरम्यान उमेदवाराला शंका,आक्षेप असल्यास त्याचे लगेच निरसन वरिष्ठ अधिकारी करतील. या भरतीसाठी ४६ पोलीस अधिकारी आणि २०८पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले.
अमिषाला बळी पडू नका
अधीक्षक डॉ.आरती सिंह म्हणाल्या की, आजपासून सुरू झालेली पोलीस भरती अत्यंत पारदर्शक होत आहे. उमेदवारांनी कोणाच्याही अमिषाला बळी पडू नये, तसेच कोणी भरती करून देतो, असे प्रलोभन दाखवून पैशाची मागणी करत असेल किंवा वशिलेबाजीचा प्रयत्न करीत असेल तर त्याबाबतची माहिती तात्काळ आपल्याला द्यावी, अथवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधवा.