औरंगाबादेत वामन हरी पेठे ज्वेलर्सवर नोकराचाच दरोडा; ५८ किलो सोन्याचे दागिने केले लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 04:01 PM2019-07-04T16:01:12+5:302019-07-04T16:18:17+5:30
तब्बल २७ कोटी ३१ लाख रुपये किंमतीचे ५८ किलो सोन्याचे दागिने लंपास
औरंगाबाद: ख्यातनाम सुवर्णपेढी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वामन हरी पेठे ज्वेलर्सकडे पंधरा वर्षापासून काम करणाऱ्या मॅनेजरनेच दोन वर्षाच्या कालावधीत तब्बल ५८ किलो सोन्याचे दागिने लंपास केल्याचे समोर आले. हा प्रकार समोर आल्यानंतर सुवर्णपेढीच्या मालकाने पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदविली. आर्थिक गुन्हेशाखेने तडकाफडकी कारवाई करीत मॅनेजरसह तीन जणांना बेड्या ठोकल्या.
मॅनेजर अंकुर अनंत राणे, राजेंद्र किसनलाल जैन आणि लोकेश पवनकुमार जैन (दोघे रा. निरालाबाजार) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना आर्थिक गुन्हेशाखेचे निरीक्षक श्रीकांत नवले यांनी सांगितले की, समर्थनगर येथे नऊ वर्षापासून वामन हरी पेठे ज्वेलर्स हे सोन्याचांदीचे दुकान आहे. या दुकानात अंकुर राणे हा सुरवातीपासून व्यवस्थापक आहे. वामन हरी पेठेकडे पंधरा वर्षापासून कार्यरत असल्यामुळे तो मालकाचा अत्यंत विश्वासू असा नोकर होता. यामुळे औरंगाबादेतील समर्थनगर येथील त्यांच्या सुवर्णपेढीची शाखा राणे याच्याच ताब्यात होती. संस्थेच्या सर्व दागिन्यांची खरेदी विक्रीची संगणकात नोंद करणे, ग्राहकांकडून आलेल्या रक्कमेचा हिशेब ठेवून ते बँकेत जमा करण्याचे काम राणेकडे होते. असे असले तरी मालकाच्या परवानगी शिवाय एकाही ग्राहकाला उधारीवर सोन्याचे अलंकार देण्याचे अधिकार राणेला नव्हते. एवढेच नव्हे तर कोणत्याही ग्राहकास दुकानाबाहेर दागिने दाखविण्यासाठी दिल्या जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश राणे यांना होते.
असे असताना राणे याने विश्वासघात करून आरोपी राजेंद्र जैन, त्याचा भाचा लोकेश जैन यांना तो सुवर्णपेढीतील सोन्याचे दागिने चोरून देत होता. आरोपी राणेने २०१७ ते २०१९ या कालावधीत राणेने आरोपी राजेंद्र जैन, भारती जैन आणि लोकेश जैन यांना त्याने तब्बल २७ कोटी ३१ लाख रुपये किंमतीचे ५८ किलो सोन्याचे दागिने दिले. एप्रिल महिन्यात सुवर्णपेढीतील दागिने कमी दिसत असल्याची माहिती एका नोकराने दुकानमालक विश्वनाथ प्रकाश पेठे यांना दिली. यामुळे विश्वनाथ हे औरंगाबादेत आले आणि त्यांनी दुकानातील दागिन्यांची आणि अन्य व्यवहाराची पडताळणी केली तेव्हा दुकानात तब्बल ५८ किलो सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याविषयी त्यांनी राणे याच्याकडे जाब विचारला असता त्याने गुन्ह्याची कबुली देत दुकानाचा मोठा ग्राहक म्हणून राजेंद्र जैनला दागिने दिल्याचे सांगितले. याप्रकारानंतर विश्वनाथ यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली.आर्थिक गुन्हेशाखेने कारवाई करीत आरोपींना अटक केली.