लहू जाधवचा आणखी तिघांना ४५ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:21 AM2018-07-28T00:21:32+5:302018-07-28T00:22:29+5:30
व्यवसायात भागीदारीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या लहू जाधवचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. तब्बल ६१ लाख ७५ हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेल्या लहू जाधवने अन्य तीन जणांची ४५ लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : व्यवसायात भागीदारीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या लहू जाधवचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. तब्बल ६१ लाख ७५ हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेल्या लहू जाधवने अन्य तीन जणांची ४५ लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी दुसरा गुन्हा शुक्रवारी सिडको पोलिसांनी नोंदविला. या गुन्ह्यात जाधवसोबत अन्य तीन जणांचा समावेश आहे.
लहू उत्तम जाधव, (रा. त्रिमूर्तीनगर, बीड बायपास परिसर), मनीषा विक्रम राजपूत (रा. राजीव गांधीनगर, मुकुंदवाडी), विक्रम हरिश्चंद्र राजपूत (रा. राजीव गांधीनगर), भरत उत्तम जाधव (रा. त्रिमूर्तीनगर), अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. विक्रम राजपूत हा आरटीओ कार्यालयात लिपिक आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितले की, व्यवसायातील नफ्यात भागीदारी देण्याच्या नावाखाली आरोपी लहू जाधवने संजय मुथियान यांना ६१ लाख ७५ हजार रुपयांचा गंडा घातला होता. याप्रकरणी त्याला १६ जुलै रोजी गुन्हे शाखेने अटक केली होती. आरोपी लहू जाधवला पोलिसांनी अटक केल्याचे कळताच मयूरपार्क परिसरातील रहिवासी अर्जुन किशनराव साळुंके, संतोष तायडे आणि अन्य एकाने आपली फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत केली. लहू जाधव आणि त्याच्या साथीदाराने एस.एन. क न्स्ट्रक्शन कंपनीचे भागीदार बनविण्याचे आमिष दाखवून प्रत्येकी १५ लाख रुपये याप्रमाणे ४५ लाख रुपये जमा केले. १६ एप्रिल २०१५ साली आरोपींनी ही रक्कम घेतली. त्यानंतर कंपनी तोट्यात आल्याचे सांगून आरोपींनी तक्रारदारांचे पैसे देण्यास नकार दिला. एवढेच नव्हे, तर पैसे मागितले, तर कारखाली चिरडून ठार मारीन, अशी धमक ीही त्यांनी दिली.
याबाबतच्या तक्रारी गुन्हे शाखेला प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी याप्रकरणी आणखी एक स्वतंत्र गुन्हा लहू जाधव आणि अन्य आरोपींविरोधात नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देशमुख आणि कर्मचारी करीत आहेत.