गंगापूर तालुक्यातील नद्यांवर वाळू तस्करांचा ‘दरोडा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:22 AM2017-12-31T00:22:00+5:302017-12-31T00:30:21+5:30
महसूल विभाग व पोलीस विभागाच्या छुप्या आशीर्वादाने गंगापूर तालुक्यातील शिवना, खांब, नारळी नदीवर वाळू तस्करांनी जणू दरोडा घातल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महसूल विभाग व पोलीस विभागाच्या छुप्या आशीर्वादाने गंगापूर तालुक्यातील शिवना, खांब, नारळी नदीवर वाळू तस्करांनी जणू दरोडा घातल्याचे चित्र आहे. दिवसरात्र बिनधास्त वाळूचा उपसा करुन सर्रास वाहतूक सुरु आहे. शासनाच्या गौण खनिजाची लूट करून वाळू तस्कर स्वत:सह पोलीस व महसूल अधिकारी-कर्मचाºयांचे चांगभले करीत आहेत.
दररोज लाखो रुपयांचा महसूल बुडवून सुरु असलेल्या या ‘धंद्या’वर कारवाई का होत नाही, हा मोठा प्रश्न आहे. सदर वाळू वाहतूक करण्यासाठी ज्या ठिकाणी रस्ते नाही, अशा अवघड ठिकाणी लाखो रुपये खर्च करून वाळू तस्करांकडून रातोरात रस्ते तयार करण्यात आले तर खांब नदीच्या पात्रात मातीचा भराव टाकून याठिकाणी देखील रस्ता तयार करण्यात आला.
वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत खांब नदीवरील शेंदुरवादा व धामोरी शिवारात वाळू उपसा करून नदीवर १५ ते २० फूट खोल व जवळपास २०० फूट लांबीचे महाकाय खड्डे तयार करण्यात आले आहेत. असे जवळपास १० ते १५ खड्डे आहेत.
या ठिकाणाहून उपसा केलेली वाळू हायवा ट्रक व डंपरद्वारे वाळूज पोलीस ठाण्यासमोरून एम. आय. डी.सी. परिसर व औरंगाबाद या ठिकाणी सर्रास विक्री केली जात आहे.
घोडेगाव येथे नारळी नदीवरील माती उपशाच्या नावाने वाळू तस्कर अक्षरश: धुमाकूळ घालत आहेत. अधिक माहिती घेतली असता या ठिकाणी एका खाजगी संस्थेतर्फे बंधारा बांधण्याचे काम हाती घेण्यात आले.
त्यासाठी काही ग्रामस्थांच्या मदतीने तहसील कार्यालयातून माती उत्खनन करण्याची परवानगी काढली असल्याची माहिती मिळाली आहे. प्रथमदर्शनी गावाच्या विकासासाठी दिसणारे हे माती उत्खनन वाळू तस्करांच्या सोयीचे ठरत आहे.
उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांच्या आदेशावरून तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी वाळू उत्खनन करणाºयांविरुद्ध कारवाई सुरु केली आहे. यात शेंदूरवादा शिवारातील प्रयागबाई भुजंगराव चव्हाण यांच्या मालकी हक्क गट क्रमांक ११९ या जमिनीच्या सातबाºयावर सात लाख रुपये, मांडवा येथील मुक्ताबाई रावसाहेब दुबिले यांच्या मालकी हक्क गट क्रमांक ७१ या जमिनीच्या सातबाºयावर सात लाख रुपये ५० हजार, महंमद नासर हिलाबी यांच्याकडून ४१ लाख ६१ हजार तर श्रीराम भावराव लघाने यांच्याकडून १४ लाख ९४ हजार रुपये दंड वसूल करण्यासाठी त्यांच्या जमिनीचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाकडून मिळाली आहे.
या तुलनेत पोलिसांकडून मात्र कारवाईचा बडगा उगारला जात नाही. स्थानिक पोलिसांसह ग्रामीण गुन्हे शाखेला महिन्याकाठी लाखो रुपयांची कमाई होत असल्याने या धंद्याला दिवसेंदिवस ‘बरकत’ येत आहे.
खबºयांना ५०० रु. रोज
तहसीलदार व पोलीस अधिकाºयांच्या कार्यालयापासून ते वाळू पट्ट्यापर्यंत वाळू तस्करांनी शेकडो 'खबरे' ५०० रुपये रोजाने तैनात केलेले आहेत. हे 'खबरे' अधिकाºयांचे लोकेशन देण्यासाठी डोळ्यात तेल घालून तालुक्यात वावरतात. त्यामुळे अनेकदा कारवाई 'फेल' होते.
गोदेला पाणी असल्याने इतर नद्या ‘लक्ष्य’
गंगापूर तालुक्यातील गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने वाळू तस्करांनी आता आपला मोर्चा शिवना नदीवरील जवळपास १० ते १५ गावांच्या शिवारात वाळू उत्खनन सुरु केले आहे. यात सनव, देवळी, दिनवाडा,आगाठाण, भागाठान, चिचखेडा, शंकरपूर, काटेपिंपळगाव, सिरेसायगाव, खडक वाघलगाव, मालुंजा, ढोरेगाव या गावांचा समावेश आहे.
पोलीस कर्मचाºयांची वाहने
या वाळू वाहतुकीमध्ये पोलीस व महसूल प्रशासनातील काही कर्मचाºयांची वाहने असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही, अशी माहिती काही कारवाई झालेल्या डंपर चालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.