घाटीची बदनामी केली म्हणून उपचाराविना रुग्णाला हाकलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 11:46 AM2018-05-22T11:46:28+5:302018-05-22T11:56:24+5:30
घाटी रुग्णालयात स्डँडअभावी वडिलांसाठी हातात सलाईन धरण्याची वेळ आल्याच्या प्रकाराने एकच खळबळ उडाली होती. या प्रकाराबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसह अनेकांकडून घाटी प्रशासनाला विचारणा करण्यात आली; परंतु याच रुग्णाला घाटीची बदनामी केल्याचे म्हणत रुग्णालयातून हाकलून देण्यात आले.
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात स्डँडअभावी वडिलांसाठी हातात सलाईन धरण्याची वेळ आल्याच्या प्रकाराने एकच खळबळ उडाली होती. या प्रकाराबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसह अनेकांकडून घाटी प्रशासनाला विचारणा करण्यात आली; परंतु याच रुग्णाला घाटीची बदनामी केल्याचे म्हणत रुग्णालयातून हाकलून देण्यात आले. अर्धवट उपचार झालेल्या या रुग्णाने सोमवारी ‘लोकमत’ कार्यालय गाठून आपली कैफीयत मांडली.
खुलताबाद तालुक्यातील मौजे भडजी येथील एकनाथ गवळे हे ५ मे रोजी घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. घाटीत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना शस्त्रक्रियागृहातून वॉर्डात नेताना हातात सलाईन धरण्याची वेळ त्यांच्या मुलीवर आली. आजारी वडिलांसाठी हातातच सलाईन धरून मुलीला उभे केल्याचे छायाचित्र व्हायरल झाल्याने घाटीतील दयनीय अवस्था समोर आली. या प्रकाराविषयी माध्यमांमधून वृत्त प्रकाशित झाले. एका बालिकेवर सलाईन बाटली हातात धरण्याची वेळ आल्याचा विषय थेट दिल्लीपर्यंतही गेला. वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसह अनेकांनी जाब विचारला.
या घटनेनंतर १८ मे रोजी डिस्चार्ज कार्ड न देता हाकलून दिल्याने उपचार अर्धवट राहिल्याचा आरोप एकनाथ गवळे यांनी केला आहे. ते म्हणाले, कमरेच्या खाली गाठ आली म्हणून घाटीत दाखल झालो. त्यावरील शस्त्रक्रिया झाली. दरम्यान, मुलीने हातात सलाईन धरल्याचा प्रकार झाला. याविषयी माध्यमांमधून वृत्त देण्यात आले. कोणी विचारले तर दोनच मिनिटे सलाईन धरली, असे सांगण्याची सूचना करण्यात आली. यानंतर पुढील उपचारासाठी मेडिसिन विभागात दाखल करण्यात आले. तेथे थेट फरशीवर गादी टाकून मला ठेवण्यात आले. याविषयी विचारले असता ‘तुम्ही त्याच लायकीचे आहात, आमची टीव्ही चॅनल, वृत्तपत्रात फार बदनामी केली’ असे काहींनी म्हटले. त्यानंतर डिस्चार्च कार्ड न देता हाकलून दिले. ‘खाजगी रुग्णालयात उपचार करा, मग समजेल किती खर्च येतो, असे काहींनी म्हटल्याचे गवळे यांनी सांगितले. कोणतीही औषधी नसल्याने त्रास होत असल्याचेही ते म्हणाले.
फोटोफ्लिक : औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात रुग्णांच्या देखभालीकडे दुर्लक्ष
रुग्ण स्वत:हून गेला
घाटी रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. के.यू. झिने म्हणाले, सदर रुग्ण काहीही न सांगता स्वत:हून रुग्णालयातून निघून गेलेला आहे. रुग्णाला मधुमेह असल्याने उपचारासाठी मेडिसिन विभागात दाखल करण्यात आले होते. त्यास कोणीही हाकलून दिलेले नाही. तो जर परत आला, तर पुढील उपचार केले जातील.