Aurangabad Violence : औरंगाबादमध्ये कशामुळे उडाला हिंसाचाराचा भडका?; 'हे' आहे खरं काळजीचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 12:08 PM2018-05-12T12:08:43+5:302018-05-12T12:18:13+5:30
महापालिकेनं गुरुवारी एका धार्मिक स्थळाची अनधिकृत नळजोडणी तोडल्यानंतर व्हॉट्स अॅपवरून काही मेसेज व्हायरल झाले होते.
औरंगाबादः अनधिकृत नळजोडणी तोडण्यावरून दोन गटांत वाद होतो आणि या ठिणगीचा वणवा संपूर्ण औरंगाबाद शहरात पसरतो, हे धक्कादायक आणि धोकादायकच म्हणावं लागेल. परंतु, हा हिंसाचार नळ कनेक्शन तोडल्यामुळे कमी आणि सोशल मीडियावरून अफवा पसरल्याने जास्त भडकल्याची चिंताजनक वस्तुस्थिती समोर येत आहे. त्यामुळे समाज जोडण्याच्या उद्देशानं सुरू झालेली समाजमाध्यमं जातीय तणावाला कारणीभूत ठरत असल्याचं दुर्दैवी चित्र कोरेगाव-भीमा प्रकरणानंतर पुन्हा दिसतंय.
महापालिकेनं गुरुवारी एका धार्मिक स्थळाची अनधिकृत नळजोडणी तोडल्यानंतर व्हॉट्स अॅपवरून काही मेसेज व्हायरल झाले होते. आमची नळजोडणी तोडलीत, तर त्यांच्या धार्मिक स्थळाची का नाही, तीही अनधिकृत आहे आणि ती तोडायलाच हवी, अशी मागणी केली गेली. महापालिकेनं हे अनधिकृत कनेक्शनही शुक्रवारी तोडलं. त्यानंतर, सोशल मीडियावरून काही अफवा पसरवल्या गेल्या, जातीय द्वेष निर्माण करण्याचाही प्रयत्न झाला. त्यानंतर, बघता बघता वेगवेगळ्या भागात जमाव रस्त्यावर उतरला आणि परिस्थिती हाताबाहेर गेली, असं लक्षात येतंय. सोशल मीडियावरून पसरलेल्या अफवांमुळे या वादाचं लोण शहरभर पसरल्याचं राज्याचे मंत्री, आमदार आणि पोलीसही म्हणताहेत. त्यामुळे व्हॉट्सअॅप, फेसबुक अत्यंत काळजीपूर्वक हाताळणं आणि त्यावरील पोस्टवर किती विश्वास ठेवायचा हे ठरवणं अत्यावश्यक झालं आहे.
कोरेगाव-भीमा प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले होते. तेव्हाही, सोशल मीडियावरून बरेच उलसुलट मेसेज फिरले होते, समाजकंटकांकडून फिरवण्यात आले होते, अफवांनी गोंधळ वाढवला होता. म्हणूनच, यापुढे प्रत्येक मेसेजचा सारासार विचार करण्याची सवय लावून घेणं गरजेचं आहे.
दरम्यान, महापालिका अधिकारी अनधिकृत नळजोडणी तोडायला गेले तेव्हा त्यांच्यासोबत पोलिसांचा फौजफाटा का देण्यात आला नाही, असा प्रश्न खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्यांचा रोख गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांवर आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे या प्रकरणावरून येत्या काळात राजकारणही पेटू शकतं.
औरंगाबादमध्ये नेमकं काय घडलं?
मोतीकारंजा परिसरात अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम महापालिका अधिकाऱ्यांनी गुरुवारपासून सुरू केली होती. त्या दिवशी त्यांनी एका धार्मिक स्थळाचं कनेक्शन तोडलं होतं. त्यामुळे त्या धर्माच्या लोकांनी दुसऱ्या धर्माच्या धार्मिक स्थळाची अनधिकृत नळजोडणी तोडण्याची मागणी केली. ती महापालिकेनं शुक्रवारी तोडली. त्यावरून हे दोन गट आमनेसामने आले आणि दगडफेक, तोडफोड, जाळपोळीच्या घटनांनी औरंगाबाद पेटलं. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या आणि नंतर गोळीबारही करावा लागला. या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे आणि पोलिसांसह अनेक जण जखमी झालेत. दुकानं, गाड्या जाळल्यामुळे आर्थिक नुकसानही मोठं झालंय. सध्या औरंगाबाद शहरात तणावपूर्ण शांतता असून जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलाय.
Internet services suspended in #Maharashtra's Aurangabad after clash between two groups last night. Section 144 (prohibits assembly of more than 4 people in an area) has been imposed in the city.
— ANI (@ANI) May 12, 2018
Police deployed in #Maharashtra's Aurangabad after clash between two groups last night. Section 144 (prohibits assembly of more than 4 people in an area) has been imposed in the city. pic.twitter.com/JPwd1evPxU
— ANI (@ANI) May 12, 2018